काँग्रेसला मुंबईत डबल सीट शिवाय पर्याय नाही!

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ आल्यास ते एकमेकांना पूरक ठरतील, त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होवू शकतो.

135

स्वबळाचा नारा देत राज्यात आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेस पक्षाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तरी डबल सीटची गरज भासणार आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ सध्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे टायमिंग साधत असल्याने परंपरागत मित्र पक्षाला बाजुला ठेवून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दर्शवली आहे. त्यासाठी काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याचा पर्याय ठेवला आहे. काँग्रेसने, समाजवादी पक्षासोबत आघाडी केल्यास दोन्ही पक्षांचा फायदा असून दोघांचेही मतदार एकाच विचाराने बांधलेले असल्याने सध्या या दोन्ही पक्षांनी एकत्र येवून निवडणूक लढवल्यास काय फायदा होईल, याची चाचपणी सुरु आहे.

काँग्रेस, समाजवादी पक्षाचे मतदार एकाच विचारांचे!                                                          

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती मानली जात आहे. पण या युतीमध्ये भाजप विरोधी काँग्रेसनेही सामील व्हावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे. परंतु महाविकास आघाडी ही राज्यातील सरकार स्थापनेसाठी केलेली असून स्थानिक स्वराज्य निवडणुका आघाडीत लढवण्याचा कुठलाही निर्णय किंवा असे वचन दिलेले नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेस पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवेल, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. परंत आजवर समाजवादी पक्षाला बाजुला सारणाऱ्या काँग्रेसला आणि त्याच्यापासून दूर जाणाऱ्या समाजवादी पक्षाला एकमेकांच्या साथीची गरज भासू लागली आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी न झाल्यानेच काँग्रेसला आपल्या अनेक जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ आल्यास ते एकमेकांना पूरक ठरतील, त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होवू शकतो.

(हेही वाचा : महापालिकेच्या कोविड सेंटरमुळे ३०९ कुटुंबे घरापासून वंचित!)

समाजवादीच्या जागा दुप्पट होणार!

मुंबई महापालिकेत काँग्रेसचे २९ नगरसेवक असून समाजवादी पक्षाचे ६ नगरसेवक आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाला त्यांची संख्या दुप्पट व्हावी एवढीच इच्छा आहे. काँग्रेसचे जे काही २९ नगरसेवक आहेत. त्यातील काही जण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे दोन-चार जागा त्यांच्या कमी होवू शकतात. पण समाजवादी पक्षासोबत युती केल्यास काँग्रेसला मोठा फायदा मिळू शकतो. हा फायदा समाजवादी पक्षापेक्षा काँग्रेस पक्षाला अधिक आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने समाजवादी व काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या काही प्रभागांमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही चाचपणी सुरु असल्याने काँग्रेस आणि सपाला आता एकत्र यावेसे वाटत आहे. विशेष म्हणजे एरव्ही या दोन्ही पक्षाची आघाडी झाली नसती, परंतु प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची जनतेशी नाळ आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांना ठेच न पोहचवता कुणाशी आघाडी करायची याची त्यांना जाण आहे. तसेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांच्याशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध पाहता या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या भागात काँग्रेस-सपाला फायदा होणार!

जर या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास मानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर, चिता कॅम्प परिसरात समाजवादी पक्षाचे वर्चस्व असले तरी काही उमेदवारांअभावी समाजवादी पक्षाला या जागा गमवाव्या लागत  आहेत. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसच्या मदतीने सपाला फायदा होवू शकतो. तसेच भायखळा, जोगेश्वरी, अंधेरी, कांदिवली, कुर्ला आदी भागांमध्ये सपाच्या मदतीने काँग्रेसला मदत होवू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.