मराठवाड्यात विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी-उद्धव गटात धुसफूस

124

मराठवाड्यात विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्यासाठी उमेदवार जाहीर करण्यावरून राष्ट्रवादी-उद्धव गटात धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार तेथे असला, तरी प्राप्त परिस्थितीत शिवसेनेला ही जागा सोडावी, असा उद्धव ठाकरे यांचा आग्रह असल्याचे कळते.

मागील तीन टर्म म्हणजे १८ वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड आहे. विक्रम काळे हे दोन टर्म, तर त्या आधी त्यांचे वडील दिवंगत वसंत काळे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता भाजप हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने बावनकुळे यांनी नुकतेच काॅंग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. महाविकास आघाडीचे मात्र अद्याप काही ठरल्याचे दिसत नाही.

मराठवाड्यातील बहुतांश आमदार शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही मोकळीक भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नुकताच औरंगाबादचा दौरा करून त्यांनी याबाबत चाचपणी केली. शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटल्यास ताकद वाढवण्यास मदत होईल, असे ठाकरे यांचे मत असल्याचे कळते.

राष्ट्रवादीकडून नकार?

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीने सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे आता ऐन मोक्यावर शिवसेनेला ही जागा सोडणे अशक्यप्राय असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. मात्र, ही जागा मिळाल्यास मराठवाड्यात पुन्हा नव्याने पक्ष उभारता येईल, असे ठाकरे गटाचे मत असल्याचे समजते.

भाजपाकडून उमेदवार जाहीर

फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षातर्फे किरण नारायण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या ९ दिवसांत त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता पाटील हे मराठवाड्यातील शिक्षक मतदार संघाचा संपर्क अभियान दौरा करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.