स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता मुंबई महापालिकेकरता ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या शुक्रवारी २९ जुलै २०२२ रोजी ओबीसी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आता एससी व एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून नव्याने ओबीसी व महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढले जाणार आहे.
३० जुलै रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणार
मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये मंगळवारी, २६ जुलै रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरता आरक्षित जागा निश्चित करण्याकरता सोडत काढण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिध्द केली जाणार आहे. तर शुक्रवारी, २९ जुलै २०२२ रोजी या प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्याकरता सोडत काढली जाईल. तर ३० जुलै रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द केले जाईल. ३० जुलै ते २ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत असेल आणि ५ ऑगस्ट २०२२ रोजी आरक्षणाबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचना यांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.
(हेही वाचा आदित्य ठाकरेंनी उभारलेला पूल गेला वाहून, आदिवासी महिलांची पुन्हा जीवघेणी कसरत)
Join Our WhatsApp Community