मुंबई पाण्याखाली तरी महापौर, आयुक्त म्हणतात ‘ऑल इज वेल’!

हिंदमाता भागातील वाहतूक पावसाळी पाण्यामुळे बंद झाली नाही, असे पंधरा वर्षात प्रथमच घडले आहे. याला महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना हे कारण आहे, असे आयुक्त इकबाल सिंग चहल म्हणाले. 

91

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. दरवर्षीप्रमाणे हिंदमाता, शीव आदी भागांमध्येही पाणी तुंबले. आजवर ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबणारच नाही, असा दावा केला जात होता, तिथला भागही पाण्याखाली गेला, तरीही प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाने पाणी तुंबले असले, तरी वाहतूक कुठेही खोळंबली नाही, असे सांगत ‘ऑल इज वेल’, असल्याचा दावा केला आहे. स्वत:ची पाठ थोपटवून घेतली आहे.

हिंदमाता म्हणजे मुंबई नव्हे!

हिंदमाता भागात वाहतूक पावसाळी पाण्यामुळे बंद झाली नाही, असे पंधरा वर्षात प्रथमच घडले असल्याचा दावा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केला आहे. पण अंधेरी सब-वे यापूर्वीच तीन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. शीव रेल्वे स्थानक भागामध्ये पाणी तुंबून रेल्वे लोकल सेवा बंद पडली.  लोकांच्या घरादारांमध्ये पाणी शिरले तरीही आयुक्त आणि सत्ताधारी पक्ष अजून मुंबईत कोठेही वाहतूक बंद झालेली नाही, असे अभिमानाने सांगत आहेत. मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षास बुधवारी दुपारी भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासह निरनिराळ्या कार्यवाहीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी निर्देश दिले.

(हेही वाचा : पाणीच पाणी चहूकडे, गेले प्रशासन कुणीकडे?)

१५ वर्षांत जे घडले नाही ते घडवून दाखवले!

मुंबईतील विविध भागांमध्ये पाणी तुंबल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हिंदमाता येथे पाहणी केली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका आपत्कालिन कक्षाला भेट दिली आणि सीसीटिव्हीवरून तुंबलेल्या पाण्याची पाहणी केली. विशेष म्हणजे नालेसफाईबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्व गटनेते आणि अधिकारी यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत जे निर्देश दिले होते, ते दुसऱ्याच दिवशी पावसात फोल ठरले. यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानंतरही रस्ते वाहतुकीमध्ये खंड पडलेला नाही. हिंदमाता येथे अतिशय सखल भागामध्ये पाणी साचले तरी हिंदमाता परिसरासाठी यंदा बांधलेल्या रॅम्पमुळे वाहतुकीला दिलासा मिळाला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक देखील सुरळीत सुरु आहे. जोरदार पाऊस व भरतीच्या वेळी हिंदमाता परिसरात साचणारे पाणी हे सेंट झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये साठविण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या भूमिगत टाक्यांना जोडणाऱ्या भूमिगत वाहिन्या टाटा मिल परिसरातून नेण्यासाठी ३१ मे २०२१ रोजी परवानगी प्राप्त झाली आहे. यामुळे भूमिगत जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला आता वेग दिला जात आहे. ते काम पूर्ण झाले की हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल. हिंदमाता भागातील वाहतूक पावसाळी पाण्यामुळे बंद झाली नाही, असे पंधरा वर्षात प्रथमच घडले आहे. याला महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना हे कारण आहे, असे आयुक्त इकबाल सिंग चहल म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.