मनसेच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत आधी मराठी ह्रदयसम्राट अशी उपाधी घेतलेल्या राज ठाकरेंचा प्रवास आता हिंदुजननायक होण्याकडे चालला आहे. राज ठाकरे यांनी झेंडा बदलून हिंदुत्वाची वाट धरल्यावर, आता मशिदींवरील भोंग्यांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हनुमान चालिसा पठणाची मोहिम हाती घेतल्यानंतर, राज ठाकरे शनिवारी पुण्यामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती करणार आहेत. याच महाआरतीच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवी चर्चा रंगली आहे.
राज यांची हिंदुत्वाकडे वाटचाल
राज ठाकरेंच्या ज्या दोन सभा झाल्या. त्या दोन्ही सभेत राज ठाकरेंची भूमिका ही कट्टर हिंदुत्ववादाची होती आणि त्यामुळे सहाजिकच आता जे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहेत. त्या पोस्टरमध्ये राज ठाकरेंची प्रतिमा हिंदुजननायक करण्याचे प्रयत्न असावेत. तसेच, याला भाजपाचेही पाठबळ असण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: भोंगे हटवण्याच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी )
हनुमान जयंतीपासून होणार नवी सुरुवात?
मुंबई आणि ठाण्यानंतर आता शनिवारी पुण्यात राज गर्जना ऐकायला मिळणार आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरु्दध जी मोहिम हाती घेतली आहे. त्याचा श्रीगणेशा शनिवारी केला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.