शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून विधानसभा अध्यक्षांना लेखी उत्तर सादर करण्यात आले असून, येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अलिकडेच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील सर्व आमदारांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले होते. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या आमदारांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली.
आता दोन्ही बाजूंकडील उत्तर सादर झाल्याने घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. ठाकरे गटाने प्रथम उत्तर सादर केल्याने त्यांना आधी संधी दिली जाईल. दररोज एका आमदाराची बाजू ऐकून घेतली जाणार आहे, अशी माहिती विधिमंडळातील सूत्रांनी दिली.
(हेही वाचा – Subhash Sawant : ठाकरे गटाचे विले पार्लेतील माजी नगरसेवक सुभाष सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश)
योग्य निर्णय घेतला जाईल – राहुल नार्वेकर
ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात, तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात, याचे मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कारवाई मी करणार आहे. अपात्रतेबाबत सुनावणी करण्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community