Maharashtra TET Scam: टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची प्रमाणपत्रे रद्द; सत्तार म्हणतात…

सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचे आणि मुलीचे नाव समोर आले आहे. अब्दुल सत्तार यांच्या चारही मुलांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचे अब्दुल सत्तार यांचे म्हणणे आहे. माझ्या मुलांची चूक असेल, तर त्यांच्यावर कारवाई करा, पण नसेल तर हे सर्व करणा-यांना फासावर लटकवा, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: तुरुंगात असताना लेख लिहिणे बेकायदेशीर; संजय राऊतांची होणार चौकशी )

हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तारांच्या मुलांची नावे आहेत.

ईडीकडे जाणार तपास? 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हाडा, आरोग्य आणि टीईटी घोटाळा उघड झाला होता. आता या घोटाळ्यांचा तपास ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी काही बड्या अधिका-यांनादेखील पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागून घेतली आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ही सर्व कागदपत्र ईडीच्या ताब्यात सोपवली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here