विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला (UBT) मुंबईत धक्का बसणार आहे. वर्सोवा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कुणाच्या वाट्याला जाणार अशी चर्चा सुरू होती. अखेर हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला. परंतु तिथे अनपेक्षितपणे ठाकरे गटाने हरुन खान यांना उमेदवारी दिली त्यामुळे येथील इच्छुक राजू पेडणेकर आणि राजूल पटेल नाराज झाले आहेत. पक्षाने अन्याय केला अशी खंत व्यक्त करत हे दोघेही अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.
पक्षाशी एकनिष्ठ राहिले; पण…
वर्सोव्यातून हरुन खान यांना उमेदवारी दिल्याने मी नाराज आहे. तिकीट देताना काय निकष पाहिले माहिती नाही. मला जेव्हा शिवसेना-भाजपा ऑफर देत होते तेव्हा मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. वेळ पडल्यास मी अपक्ष निवडणुकीत उभे राहणार आहे. मागील निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून मी ३२८०० मते घेतली होती. जे आमदार झाले त्यांना ३६ हजार आणि मला ३२ हजार मतदान झाले होते. मी दुसऱ्या क्रमांकावर होते. युतीत ही जागा भाजपाला गेली होती म्हणून मी अपक्ष निवडणूक लढले होते असे त्यांनी सांगितले. तसेच २०१४ साली माझा अर्ज बाद झाला होता, त्यामुळे गेल्या निवडणुकीत मी अपक्ष निवडणूक लढवून पक्षाचे नुकसान भरून देईन असे वाटले होते. परंतु यावेळी संधी मिळेल अशी अपेक्षा होती, असेही राजूल पटेल यांनी खंत व्यक्त केली. (UBT)
५ टर्म झाला अन्याय
२००४,२००९,२०१४,२०१९ आता २०२४ ला या सर्वाचा न्याय निवाडा माझ्या वर्सोवा विधानसभेतील माझ्या जिवाभावाचे शिवसैनिक, कार्यकर्ते, व सर्व सामान्य जनता नक्कीच करेल ही त्यांच्याकडून अपेक्षा. मी या अन्याय विरुद्ध लढत आहे. तीन दशकाच्या माझ्या राजकीय सामाजिक जीवनाच्या प्रवासात कधीतरी हा छोटासा कार्यकर्ता तुमचा राजू तुम्हाला उपयोगी पडला असेल तर मला नक्की बळ द्या! अन्यायाविरुद्धच्या या लढाईत सामील व्हा, आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असे आवाहन वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे दुसरे इच्छुक राजू पेडणेकर यांनी जनतेला केले आहे. त्यामुळे राजू पेडणेकर हेदेखील या निवडणुकीत अपक्ष उतरण्याची तयारी करत आहेत. (UBT)
Join Our WhatsApp Community