स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : भाजपा नंबर १, महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची ताकद कायम असल्याचे दिसून आले आहे, तर काँग्रेसने मात्र फिनिक्स भरारी घेतली आहे, असे चित्र दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, बुधवारी, ६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीच्या पोट निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. विशेष म्हणजे या निवडणुका सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे लढले, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरवून त्या ठिकाणी आघाडी करायची का, याचे स्वातंत्र्य महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. तसेच भाजपानेही त्याप्रमाणे लवचिक धोरण स्वीकारले होते. त्यानुसार या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सर्वाधिक जागा मिळवणारा भाजपा हा पक्ष समोर आला आहे. तर महाविकास आघाडीतील ३ राजकीय पक्षांपैकी काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ म्हणून समोर आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाची ताकद कायम असल्याचे दिसून आले आहे, तर काँग्रेसने मात्र फिनिक्स भरारी घेतली आहे, असे चित्र दिसत आहे.

शिवसेनेला हा धडा! – प्रवीण दरेकर

दरम्यान या निवडणुकांच्या निकालानंतर भाजपाची ताकद कायम आहे, आमची घौडदौड अशीच सुरु राहणार आहे. मात्र हा शिवसेनेसाठी धडा आहे. ज्या महाविकास आघाडीत मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचे अस्तित्व आहे, त्या शिवसेनेची पीछेहाट सुरु झाली आहे. हे शिवसेनेसाठी महत्वाचे संकेत आहेत. या शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र त्यांच्या स्वकृत्वाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आणि त्यांनी यश प्राप्त केले. नाना पटोले हे जरी महाविकास आघाडीत असले तरी त्यांच्यासाठी पक्ष हा प्राधान्याचा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

(हेही वाचा : एनसीबीची क्रूझवरील छापेमारी बनावट! भाजपाचा उपाध्यक्ष होता कारवाई पथकात!)

काँग्रेसने दगाफटका केला नाही! – नाना पटोले

ही काँग्रेस पक्षाची सुरुवात आहे. या निवडणुकीत आम्ही भाजपाच्या बरोबरीचे आहे, मात्र उद्याच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे. आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी निवडणुका सगळ्यांनी स्वतंत्र लढवल्या आहेत. जर आम्ही एकत्र लढवल्या असत्या तर आम्ही दगाफटका केला असे म्हणता आले असते, पण मुळातच आम्ही सर्व पक्ष स्वतंत्र लढलो आहोत, त्यामुळे काँग्रेसवर आरोप करण्याची गरज नाही. आमची भाजपसोबत बरोबरी नाही. आमचा पक्ष गावात पोहचला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

काय आहेत निवडणुकीचे निकाल?

६ जिल्हा परिषद

 • एकूण जागा ८५
 • भाजपा – २३
 • शिवसेना – १२
 • राष्ट्रवादी – १७
 • काँग्रेस – १७
 • इतर – १६

पंचायत समिती

 • एकूण जागा – १४४
 • भाजप – ३३
 • शिवसेना – २२
 • राष्ट्रवादी – १६
 • काँग्रेस – ३५
 • इतर – ३८

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here