मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये प्रत्येकी २० याप्रमाणे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समुदाय चिकित्सालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर प्रायोगिक तत्वावर २ ऑक्टोबरपासून काही चिकित्सालय केंद्र सुरु केल्यानंतर याचा शुभारंभ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी १७ नोव्हेंबरला केला जाणार आहे. धारावीतील ओएनजीसी इमारतीशेजारील जागेत बाळासाहेब ठाकरे समुदाय चिकित्सालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते गुरुवारी १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या दवाखाने आणि आरोग्य केंद्रांच्या सुविधांमध्ये दर्जोन्नती करतानाच अधिकाधिक दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टयांमधील जनतेला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी पोर्टा केबिन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर आदी तिन्ही ठिकाणी प्रत्येकी २० याप्रमाणे या पोर्टा कॅबिन उभारुन त्याद्वारे आरोग्य सुविधा पुरवली जाणार आहे. या नवीन संकल्पनेला तत्कालिन महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समुदाय चिकित्सालय अशाप्रकारे नाव दिले आहे. या चिकित्सालयात सर्व प्रकारचे उपचार केले जाणार असून विविध प्रकारच्या चाचण्याही केल्या जाणार आहे. त्यामुळे रुग्णांवरील प्राथमिक उपचारांसह विविध प्रकारच्या आजारांवरही उपचार केले जाणार असल्याने रुग्णांना मोठ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही.
मागील २ ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्वावर हिंद्ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समुदाय चिकित्सालय सुरु करण्यात आल्यानंतर प्रथमच याचा शुभारंभ केला जात आहे. त्यामुळे धारावीतील या दवाखान्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते केला जाणार आहे. याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह लोकप्रतिनिधी अतिरिक्त संजीव कुमार, उपायुक्त संजय कुऱ्हाडे, परिमंडळ दोनचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि जी उत्तर विभागाचे प्रशांत सपकाळे आदी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
२ ऑक्टोबरला सुरु केलेल्या समुदाय चिकित्सालयांची संख्या
- पोर्टा कॅबिन : १०
- उपलब्ध दवाखाने : २७
- पॉलिक्निक्स अँड डायग्नोस्टीक्स सेंटर : १३
- एकूण : ५०