महापालिकेवर प्रशासक: भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते

गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलांचे भूमिपूजन शनिवारी उपनगराचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते पार पडले.

168

गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलांचे भूमिपूजन शनिवारी उपनगराचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते पार पडले. विशेष म्हणजे स्थायी समितीमध्ये डिसेंबरमध्ये प्रस्ताव संमत झालेला असताना १२ मार्च रोजी अर्थात ८० दिवसांनी याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करून नगरसेवकांना घरी बसवण्यात आले आहे आणि दुसऱ्या बाजूला महापालिका निधीतून केल्या जाणाऱ्या कामांचे भूमिपूजन राज्याचे मंत्री करत आहेत. त्यामुळे महापालिकेतील विकासकामांची उद्घाटन तथा भूमिपूजन हे १९८४-८५मध्ये प्रशासकाच्या माध्यमातून केले जायचे, परंतु याठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते करून नव्याने नेमलेले प्रशासक नवीन पायंडा पाडतात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : मुंबई महापालिकेत सत्तापालट…सन १९८४-८५ची पुनरावृत्ती होणार? )

पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलांचे भूमिपूजन भांडूप पश्चिम परिसरातील ‘डॉक्टर हेडगेवार जंक्शन’ जवळ असणाऱ्या ‘श्रीमती गोदावरी धोंडीराम पाटील मैदान’ येथे उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते संपन्न झाले. महापालिका प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना आमदार रमेश कोरगावकर व सुनिल राऊत, उपायुक्त (पायाभूत सुविधा) राजेंद्रकुमार तळकर, उपायुक्त (परिमंडळ ६) देविदास क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी माजी खासदार संजय पाटील, शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर, माजी नगरसेवक बाबा कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी या व्यासपीठावर उपस्थित होते.

मुंबई महापालिकेत प्रशासकाची नेमणूक करण्यात आल्याने महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या प्रत्येक विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन हे महापालिकेच्या प्रशासकाच्या हस्ते होणे आवश्यक आहे. याठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन अथवा उद्घटन करणे अशाप्रकारची प्रथाच नसताना प्रशासकांनी अशाप्रकारचा कार्यक्रम मंत्री महोदयांच्याहस्ते करून घेतला तसेच हे करताना त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान दिले हा मुद्दा चर्चेचा बनला आहे. त्यामुळे प्रशासक याच कामांसाठी नेमले का असाही सवाल उपस्थित होत आहे.

पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविणे गरजेचे

याप्रसंगी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी, मुंबई आणि मुंबई महानगरातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन मुंबईत विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. मात्र, हे प्रकल्प राबवित असतानाच मुंबईचे पर्यावरण जोपासणे आणि मुंबईचे वनवैभव जपणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याखालून बांधण्यात येणा-या या भूमिगत मार्गाची बांधकाम प्रक्रियाही पूर्णपणे जमिनीखालीच खोलवर करण्यात येणार आहे. जेणेकरून जंगलातील पर्यावरणाला, वृक्षाला व प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.