बहुप्रतिक्षित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे असून, जानेवारीपूर्वी हा मार्ग खुला होणे जवळपास अशक्य असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) सूत्रांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाच्या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यापैकी ४९१ किलोमीटरचा नागपूर-शिर्डी रस्ता तयार झाला आहे. त्यात नागपूर ते सेलूबाजार २१० किमी आणि मालेगाव ते शिर्डीदरम्यानच्या २८१ किमी मार्गाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील २९ किमी रस्ता पूर्ण होणे बाकी. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीवर पुलाच्या कामाचा समावेश आहे. दुसरा टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन केले जात आहे.
(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम)
पंतप्रधान दाखविणार हिरवा कंदील
समृद्धी महामार्ग व नागपूर मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू ते कामठी रोड मार्गाचे लोकार्पण एकत्र केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यात या मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हे प्रकल्प सुरू केले जाणार होते. मात्र, समृद्धी महामार्गाचे काम लांबल्यामुळे विलंब होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर पंतप्रधानांची वेळ घेतली जाईल. त्यामुळे जानेवारीपूर्वी हा महामार्ग खुला होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community