भाजपा नेत्यांचे ‘ब्लॅकमेल’ करण्याचे काम सुरू- नाना पटोले

बेछूट आरोप, स्टंटबाजी करुन भाजपा नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

118

माध्यमे, उद्योगपती आणि विरोधी पक्षांतील राजकीय नेते यांच्यावर बेछूट आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. केंद्रातील सरकारने राज्यातील भाजपा नेत्यांना ब्लॅकमेलींग करण्याची परवानगीच दिली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न

माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतक-यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी बेताल वक्तव्ये आणि बेछूट आरोप, स्टंटबाजी करुन भाजपा नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनंत चतुर्दशी असताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जाणीवपूर्वक स्टंटबाजी करुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

(हेही पहाः सोमय्यांवर कारवाई कोणी केली?)

आम्हाला भीती नाही

आम्हाला भाजपाच्या कुठल्याही इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमचा कोणताही मंत्री दोषी नसल्याने त्यांच्या आरोपांची काँग्रेसला कसलीही भीती नाही. ईडी आणि सीबीआयचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जातो, हे सारा देश बघत आहे. त्यामुळे कोणीतरी ओरडावं आणि आपण त्याकडे लक्ष द्यावं, असं करण्याची काहीच गरज नाही. कारण कर नाही त्याला डर कशाला, असे पटोले म्हणाले.

फडणवीस सरकारच्या फाईली काढण्याची वेळ

किरीट सोमय्यांना त्यांच्या पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहीत आहे. पण त्यांना जर खरंच भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल, तर त्यांनी भाजपामधील भ्रष्टाचारी धेंडांना उघडं करावं. मगंच त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा पाठिंबा मिळेल. फडणवीस सरकारच्या काळातील काही फाईली काढण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही, किती खाल्ले तेही सांगून जावे, असेही पटोले म्हणाले.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी हिरवा रंग धारण केला! किरीट सोमय्यांचा आरोप)

त्यांचे स्वप्न खरे होणार नाही

मुख्यमंत्र्यांचा स्वभाव गंमत करण्याचा आहे, त्यांच्या पद्धतीने ते बोलले. पण भाजपा नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्न पडत आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असे पटोले म्हणाले.  

लवकरच काँग्रेस गावागावांत पोहोचणार

महाराष्ट्राच्या स्थापनेला आता ६० वर्षे झाली आहेत. स्थापनेपासून ते महाराष्ट्राला आघाडीचे राज्य बनवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. या ६० वर्षांत काँग्रेस सरकारांनी केलेली कामे आणि भविष्यात महाराष्ट्र कसा घडवायचा आहे, याचा कार्यक्रम घेऊन लवकरच आम्ही गावागावांपर्यंत जाणार आहोत, असेही पटोले म्हणाले.

(हेही वाचाः सोमय्यांवरील कारवाईची निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी! भाजपाची मागणी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.