सोलापूरच्या काँग्रेस आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांची राज्याच्या मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापूर येथील काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेस नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी प्रणिती शिंदेंच्या मंत्रीपदाबाबत भाष्य करत शिंदे समर्थकांना आश्चर्याचा गोड धक्का दिला आहे.
काय म्हणाले कदम?
काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना कदम म्हणाले की, सोलापूरचे तरुण नेतृत्त्व आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रिमंडळात नाहीत, याची आम्हाला खंत वाटते. मात्र लवकरच प्रणिती शिंदे राज्याच्या मंत्रिमंडळात प्रवेश करतील. इतकंच नाही तर राज्यमंत्री पदापेक्षा कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात येईल, असेही सूतोवाच त्यांनी केले.
शिंदे समर्थकांचा जल्लोष
तरुणपणी वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी आमदार झालेल्या प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांनी, विश्वजीत कदमांच्या या विधानानंतर एकच जल्लोष करत टाळ्यांचा कडकडाट केला. प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य विधानसभआ मतदार संघातील काँग्रेसच्या आमदार आहेत.
प्रणिती शिंदेंचा दबदबा
2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत प्रणिती शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. 2014 आणि 2019च्या निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीच्या मतांचे पारडे जड असताना सुद्धा सोलापुरातील जनतेने प्रणिती शिंदे यांना झुकते माप देत भरघोस मतांनी विजयी केले होते. प्रणिती शिंदे यांच्या याच दबदब्यामुळे त्यांना मंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
Join Our WhatsApp Community