समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे आता आयकर विभागाने आपला मोर्चा वळवला असून अबू आझमी हे आयकरच्या रडारवर आहेत. आझमी यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साधारण २० हून अधिक ठिकाणांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे.
(हेही वाचा – RBI ची ‘या’ 9 बँकांवर कठोर कारवाई! 12 लाखांचा दंड, यामध्ये तुमच्या बँकेचा समावेश आहे का?)
आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान, बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशांसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकत्ता आणि लखनऊ यासह इतरही ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे. व्यावसायांमध्ये पैशांची अफरातफर केल्याचा संशय आयकर विभागाला असून काही महिन्यांपूर्वीच या विभागाची नजर होती. अबू आझमी यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत आझमी यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अबु आझमी अमरावती आणि अखोल्याच्या दौऱ्यावर होते. या ठिकाणी आयोजित असणारे सर्व कार्यक्रम रद्द करून ते मंगळवारी सकाळी मुंबईला पोहोचले आहेत. मला याबाबत कोणतीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया आझमी यांनी या झालेल्या कारवाईनंतर दिली.
आयकर विभागाने कुलाब्यातील कमल मेंशन या इमारतीत ही छापेमारी केली आहे. या ठिकाणी अभा गुप्ता आणि अबू आझमी यांचे कार्यालय आहे. यावेळी असे आरोप करण्यात आला की, अभा गुप्ताद्वारे कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुप देखील आयकर विभागाच्या रडारवर आहे. आयकर विभागाने हवाला ऑपरेटर्सकडे छापेमारी केली असल्याची माहिती मिळत आहे.