अजित पवारांच्या नातेवाईकांवर धाड! काय म्हणाले दादा? वाचा…

ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्यावर धाडी टाकल्या त्याचं वाईट वाटलं, असेही अजित पवार म्हणाले.

124

अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर त्यांंच्या कंपन्यांवर धाड टाकली जात असेल, तर कुठल्या स्तरावर या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातो, त्यामुळे राज्यातील जनतेने या गोष्टींचा विचार जरूर केला पाहिजे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडले. आयकर विभागाने गुरुवार, ७ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर धाडी टाकल्या आहेत. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता आयकर विभागाने धाडी टाकल्याचे वृत्त खरे आहे असे सांगितले.

हे सगळे फार धक्कादायक असून राजकारणी लोकांना कुटुंब नसते का? देशाच्या संस्कृतीला अशोभनीय असे खुनशी राजकारण गेल्या ७ वर्षांत सुरु आहे. उद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ईडीची नोटीस आली, तर आश्चर्य वाटायला नको. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन ईडी, आयकर अशा यंत्रणांचा राजकीय वापर सुरु आहे. याचा निषेध आहे.
– यशोमती ठाकूर, महिला आणि बालकल्याण मंत्री

काही संंबंध नसलेल्यांवर धाडी टाकल्याचे दु:ख

आयकर विभागाने इतर कंपन्यांवर धाडी टाकल्या त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, जे त्यांना योग्य वाटेल ते करु शकतात, परंतु ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्यावर धाडी टाकल्या त्याचं वाईट वाटलं, असेही अजित पवार म्हणाले. अनेक सरकारे येत-जात असतात, शेवटी जनता सर्वस्व आहे. जनता योग्य निर्णय घेते. मागील निवडणुकीच्या अगोदर शरद पवार यांच्या बँकेशी संबंध नसतानाही ईडीने नोटीस काढली होती. त्यातून रामायण म्हणा किंवा राजकारण म्हणा ‘घडलं आणि जनतेने बोध घेतला’, असे सूचक विधानही अजित पवार यांनी यावेळी केले.

(हेही वाचा : लखीमपूर खेरी प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल! सुनावणी होणार)

ही राजकीय हेतूने धाड टाकली का?

आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना शंका आली म्हणून त्यांनी छापेमारी केली. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत, कारण मी स्वतः अर्थमंत्री आहे. आर्थिक शिस्त कशी लावायची…कर चुकवायचा नाही…कर व्यवस्थितपणे कसा भरायचा हे मला माहीत आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. माझ्या संबंधित सर्व कंपन्यांचे कर व्यवस्थितपणे…वेळच्या वेळी भरले जातात. त्यात काही अडचण नाही. तरी मी म्हणून उपयोग नसतो. आता ही राजकीय हेतूने धाड टाकली की आयकर विभागाला आणखीन काही माहिती हवी होती ते आयकर विभागाच सांगू शकतील, असेही अजित पवार म्हणाले. माझ्या संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर काही म्हणायचं नाही कारण मी एक नागरिक आहे. मात्र एका गोष्टीचं दु:ख आहे की, माझ्या बहिणी ज्यांची ४० वर्षांपूर्वी लग्न झाली. सुखाने संसार करत मुलं आहेत, त्यांची लग्न होऊन त्यांना नातवंडे आहेत. एक बहीण कोल्हापूर आणि दोन बहिणी पुण्यात आहेत, त्यांच्यावर धाडी टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण समजू शकलं नाही, अशी शंकाही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.