अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर! कुठे टाकल्या धाडी? 

आयकर विभागाची पथके देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी शुक्रवारी दाखल झाले होते, पथक शनिवारी पहाटे झाडाझडती करुन निवासस्थानातून बाहेर पडले.

83

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सीबीआय आणि ईडीच्या कारवाईपासून सुरक्षित राहण्यासाठी लपून बसले आहे. मात्र म्हणून त्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा थांबलेला नाही. आता यात आयकर विभागाची भर पडली आहे. देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी आयकर विभागाची पथके शुक्रवारी दाखल झाले होते, पथक शनिवारी पहाटे झाडाझडती करुन निवासस्थानातून बाहेर पडले.

अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आणि त्यासोबतच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाने शुक्रवारी धाड टाकली. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तब्बल १६ तास झाडाझाडती करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली.

शनिवारीही चौकशी?

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून निघाले. यावेळी अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आपल्यासोबत नेल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच ही चौकशी शनिवारीही सुरूच राहण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या घरी ज्यावेळी आयकर विभागाने धाड टाकली त्यावेळी त्यांच्या घरी अनिल देशमुख आणि त्यांची दोन्ही मुले उपस्थित नव्हते. तर अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि सून घरी होत्या.

ईडीची उच्च न्यायालयात तक्रार 

दरम्यान शुक्रवाडी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात देशमुखांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. देशमुख यांच्या विरोधात ५ समन्स बजावले तरी ते हजर राहले नाहीत, असे ईडीने मुंबई उच्चन्यायालयात म्हटले आहे. तर ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचा उल्लेख करण्यात आला नाही, अशीही माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.