संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ! 

संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थान आणि दैनिक सामना कार्यालय या दोन्ही ठिकाणचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत जिथे कुठे दिसतील तिथे त्यांच्या करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी दिला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारने संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या ताफ्यात सशस्त्र स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे २ अतिरिक्त जवान वाढवण्यात आले आहेत.

राऊतांना ‘वाय’  दर्जाची सुरक्षा! 

संजय राऊत यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामध्ये १२ पोलिस आणि सशस्त्र स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या ४ जवानांचा सहभाग आहे. त्यामध्ये आता आणखी २ सशस्त्र स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या जवानांची वाढ करण्यात आली आहे. तसेच संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थान आणि दैनिक सामना कार्यालय या दोन्ही ठिकाणचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी या दृष्टिकोनातून राऊत यांची भेट घेतली आहे.

(हेही वाचा : मनसेकडून मुख्यमंत्र्यांना कमिशनर रँडची उपमा!)

का वाढवली सुरक्षा? 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु होती, त्यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा अवमानकारक उल्लेख केला. याप्रकरणी राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांनी राणे यांच्यावर जहरी टीका केली, तसेच दैनिक सामानाच्या अग्रलेखातूनही टीका केली. त्यावर नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र निलेश आणि नितेश राणे यांनीही राऊत यांच्यावर प्रतिहल्ला केला. तसेच निलेश राणे यांनी ‘संजय राऊत जिथे कुठे दिसतील, तिथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू’ अशी धमकी दिली. त्यामुळे संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here