Independence Day 2023 : स्वातंत्र्यावर बोलू काही…

197
  • माधव भांडारी

आज आपण आपला शहात्तरवा स्वातंत्र्यदिन साजरा करत शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु करत आहोत. जगाला नेतृत्व देण्याची क्षमता असलेला एक समर्थ, संपन्न देश येत्या पंचवीस वर्षात उभा करण्याची आकांक्षा बाळगून त्या दिशेने सर्व प्रकारे प्रयत्न करण्याची प्रेरणा आजच्या तरुणांच्या मनामध्ये आहे. हे काम करत असतानाच आपल्याला आपला इतिहासही योग्य प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. कारण जे इतिहासातून काही शिकत नाहीत त्यांना फारसा भविष्यकाळ उरत नाही अशा आशयाच्या म्हणी जगातील सर्व भाषांमध्ये आहेत व त्या सर्वस्वी खऱ्या आहेत. ज्यांनी इतिहासातून काहीही धडे घेतले नाहीत अशा संस्कृती आणि असे देश जगाच्या पाठीवरून नामशेष झाल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या समोर आहेत. आपण सुद्धा इतिहासातून योग्य तो बोध घेण्याच्या बाबतीत अनेकदा कमी पडलो आणि त्याची किंमत आपल्याला स्वातंत्र्य गमावून, गुलामगिरी पत्करून चुकवावी लागली. प्रथम मुस्लीम आक्रमक आणि नंतर इंग्रज यांच्या गुलामगिरीतून पूर्णपणे स्वतंत्र झाल्यानंतर आतातरी, आपण पूर्वी केलेल्या चुका पुन्हा न करण्याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. मात्र त्यासाठी इतिहास नीट समजून घेतला पाहिजे.

काँग्रेसकडून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खोट्या गोष्टींच्या नोंदी

इतिहास हा नेहेमी काही शतकांपूर्वीचाच असावा लागतो असे मुळीच नाही. पन्नास पंचाहत्तर वर्षांपूर्वी घडलेल्या घटना सुद्धा इतिहासाच्या भाग असतात. किंबहुना त्या घडत असलेल्या इतिहासाचा हिस्सा असतात. त्यांचा अभ्यास अधिक बारकाईने करणे सहज शक्य असते. कारण त्या घटना आपल्या समोर घडत असतात किंवा त्या बघितलेल्या व्यक्ती आपल्या आसपास असतात, त्यांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेली साधने मोठ्या प्रमाणावर व तुलनेने सहजगत्या उपलब्ध असतात. ‘१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य’ हा सुद्धा एक असाच नजीकच्या काळात घडलेला इतिहास आहे. त्या इतिहासाची छाननी वेगवेगळ्या पद्धतीने करणे, वेगवेगळ्या पैलूंनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये या पद्धतीने त्या इतिहासाचा अभ्यास होणार नाही अशी व्यवस्थाच तेव्हाच्या काँग्रेस सरकारने डाव्या, कम्युनिस्ट अपप्रचार यंत्रणेच्या मदतीने लावून ठेवली होती. एक दोन नेते आणि एक कुटुंब यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले असे एक अत्यंत खोटे व स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचा अपमान करणारे कथन त्यांनी प्रस्थापित करून ठेवले होते. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ होता. अशा कथनाच्या आधाराने एका कुटुंबाच्या हातात सर्वंकष सत्ता केंद्रित करता येत होती. त्या सत्तेचा अतिशय क्रूर वापर करून विरोधकांना चिरडता येत होते. जवळपास साठ – पासष्ट वर्षे हा उद्योग निर्वेध चालला. त्यात सत्तेचा वापर हा जसा मुद्दा होता तसा दुसरा मुद्दा स्वत:च्या चुका, गफलती जनतेपासून झाकून ठेवण्याचा देखील होता. इंग्रज भारतातून निघून जाण्याच्या तयारीत असताना त्यावेळच्या काँग्रेस नेतृत्वाने केलेले राजकारण भारताच्या हितसंबंधांची जपणूक करणारे नव्हते तर ते इंग्रजांच्या सोयीचे, त्यांना हवे असलेले राजकारण होते. म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक बाबतीत जनतेसमोर खोटे बोलत रहाणे काँग्रेस नेतृत्वाला गरजेचे वाटत होते. अशा काही खोट्या गोष्टींच्या नोंदी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केल्या पाहिजेत.

india 1

(हेही वाचा Chine : चीनची अर्थव्यवस्था म्हणजे बॉम्ब – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन)

काँग्रेसचे नेतृत्व इंग्रजांचे बटीक बनलेले

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपण स्वतंत्र झालो असे मानून आपला स्वातंत्र्य दिन त्या दिवशी साजरा केला जातो. पण मुळात हेच अर्धसत्य आहे. ‘भारताला स्वातंत्र्य देण्याची’ जी घोषणा इंग्रजांनी केली त्यानुसार त्यांनी तीन Dominions निर्माण केली होती – पाकिस्तान, भारतातील सर्व ५६५ लहानमोठी संस्थाने आणि उरलेला भारत! आजचा भारत त्यांनी जाहीर केला नव्हता. ‘पाकिस्तानात जाणे, स्वतंत्र रहाणे अथवा भारतात सामील होणे ह्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य’ इंग्रजांनी सर्व संस्थानांना दिले होते. म्हणजे आजचा भारत त्यांनी स्वतंत्र केला नव्हता. या संस्थानांनी एकत्र येऊन स्वतंत्र राज्य/राष्ट्र स्थापन करावे व इंग्रज साम्राज्याच्या अधीन रहावे यासाठी इंग्रज १९४७ सालातही प्रयत्न करत होते. ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, हा भाग वेगळा. पण आपल्या देशाचे अशा प्रकारचे ५६७ तुकडे इंग्रज करत असताना काँग्रेसचे नेतृत्व त्याला मान डोलावत होते. त्यांनी त्या प्रकाराला विरोध केला नव्हता. नंतर सरदार पटेल यांनी अत्यंत झपाट्याने आणि मुत्सद्देगिरीने या संस्थानांचे विलीनीकरण करून घेतले म्हणून भारताचा आजचा नकाशा आपल्याला दिसतो आहे. भारताचे एवढे तुकडे करण्याचा प्रयत्न इंग्रज शेवटच्या क्षणापर्यंत करत होते आणि काँग्रेस त्याला विरोध करत नव्हती, हा सर्व इतिहास भारतीय नागरिकांना पूर्ण तपशिलासह समजला पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. काँग्रेसचे तेव्हाचे नेतृत्व असे का वागत होते या प्रश्नाचे उत्तरही जनतेला मिळाले पाहिजे.

india1

भारत खऱ्या अर्थाने १९६८ साली झाला स्वतंत्र

जसे इंग्रज भारतावर राज्य करत होते तसेच फ्रेंच आणि पोर्तुगीज सुद्धा भारताचा काही भाग बळकावून बसलेले होते. इंग्रजांना बाहेर काढत असताना फ्रेंच आणि पोर्तुगीजांना सुद्धा भारत सोडून जायला भाग पाडणे आवश्यक होते. पण आश्चर्याचा भाग म्हणजे हा विषय काँग्रेसच्या विषय पत्रिकेतच नव्हता. गोवा, दीव, दमण, दादरा नगरहवेली, असे प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होते तर पाँडेचरीसकट एकूण आठ ठिकाणी फ्रेंचाच्या वसाहती होत्या. हे सर्व प्रदेश भारताचेच अविभाज्य घटक होते. आपल्या अन्य बांधवांप्रमाणे त्यांनाही स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते. पण काँग्रेसचे नेतृत्व या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करत होते. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करणे तर लांब राहिले पण तोंडदेखला पाठींबा द्यायला सुद्धा काँग्रेसचे तेव्हाचे सर्वोच्च नेतृत्व तयार नव्हते. त्यामुळे गोवा स्वतंत्र होऊन भारतात सामील व्हायला १९६१ साल उजाडले. दीव, दमण, दादरा, नगरहवेली यांचे विषयसुद्धा त्याच पद्धतीने झाले. तेथील स्थानिक जनता व रा.स्व.संघ आणि अन्य काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र उठाव करून पोर्तुगीजांना हाकलून लावले. फ्रेंच वसाहतींचा विषय तर १९६८ पर्यंत सोडवला गेला नव्हता. या सर्व इतिहासाचा साधा सरळ अर्थ इतकाच आहे की १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रज भारतातून निघून गेले असे विधान करणे बरोबर आहे. पण आज दिसणारा ‘स्वतंत्र भारत’ त्या दिवशी अस्तित्वात आला नव्हता, तो यायला तब्बल वीस वर्षे जावी लागली. ती प्रक्रिया १९६८ साली पूर्ण झाली. काँग्रेसी राज्यकर्त्यांनी मनावर घेतले असते तर हे काम पहिल्या एक दोन वर्षात पूर्ण झाले असते. त्यांनी ते का केले नाही? अन्य युरोपियन देशांच्या ताब्यात असलेले आपले भूभाग सोडवून गुलामगिरीत अडकलेल्या आपल्या बांधवांना आपल्याबरोबर स्वतंत्र भारतात सामील करून घेणे हा मुद्दा काँग्रेसच्या विषयपत्रिकेवर कधीच का नव्हता ? ह्या प्रश्नाचे उत्तर देखील काँग्रेसने दिले पाहिजे. इंग्रज निघून गेले तरी सन १९५०पर्यंत आपण ब्रिटीश साम्राज्याचाच भाग British Dominion होतो, आपले पंतप्रधान इंग्लंडच्या महाराणीला उत्तरदायी होते, ही वस्तुस्थिती सुद्धा काँग्रेसने जनतेला कधी समजू दिली नव्हती. आपल्या स्वातंत्र्याशी जोडलेले असे अनेक मुद्दे आहेत. त्या मुद्यांचा अभ्यास केला पाहिजे व त्यामागील वास्तव नव्या पिढ्यांना कळले पाहिजे.

(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.