अमृतमहोत्सवी वर्षाच्या जनजागृतीचे प्रचारसाहित्य: शासनाच्या निर्देशानुसारच

76

राज्य शासनाकडून तयार करण्यात आलेल्या मूळ संकल्पनेवर आधारित प्रचार साहित्याशी साधर्म्य राखत मुंबई महापालिकेने मूळ जनजागृती संकल्पना साहित्य प्रसारित केले आहे. त्यात फक्त मुंबईशी अनुरूप बोधचिन्ह आणि प्रतिमा समाविष्ट केल्या आहेत. संपूर्ण राज्यभरात जनजागृती करताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदी मान्यवरांची छायाचित्रे समाविष्ट करण्याविषयीचे निर्देश प्राप्त होताच ती सुध्दा छायाचित्रे समाविष्ट करुन त्याचे पालन करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व निर्देशांचे योग्य पालन केले असून, त्यामुळे महापालिका प्रशासनाने राजशिष्टाचाराचा कोणत्याही स्वरुपाचा भंग केला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेकडून अभियानास सुरुवात

घरोघरी तिरंगा अभियान संदर्भात जनजागृती करताना मुंबई महापालिकेच्या प्रसिद्धी साहित्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे समाविष्ट नसल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी महापालिका प्रशासनावर केला होता. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देताना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे मुंबई महापालिकेकडून घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येत आहे.

संपूर्ण राज्यासाठी संकल्पना

या अभियानासंदर्भात संपूर्ण राज्यासाठी लागू असलेले परिपत्रक महाराष्ट्र शासनाने दिनांक २० जुलै २०२२ रोजी निर्गमित केले. त्यानुसार जनजागृती करण्यासाठी राज्य शासन अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले बोधचिन्ह, मूळ जाहिराती डाऊनलोड करून महापालिकेने आपले प्रचार साहित्य तयार केले आणि दिनांक २१ ते ३० जुलै २०२२ या कालावधीत अंमलबजावणीही केली. त्यावेळी मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांची छायाचित्रे मूळ प्रचार साधनात समाविष्ट केलेली नव्हती अथवा त्याबाबतचे कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नव्हते. ही बाब संपूर्ण राज्यासाठी लागू होती. स्वाभाविकच संपूर्ण राज्यस्तर अभियानाप्रमाणे महापालिकेनेही आपल्या जनजागृती अभियानात तीच संकल्पना साधर्म्य कायम ठेवले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

छायाचित्रे केली समाविष्ट

जनजागृतीच्या पुढील टप्प्यांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पंतप्रधान यांचेही छायाचित्र समाविष्ट करून जनतेला आवाहन करण्याच्या उद्देशाने २ ऑगस्ट २०२२ रोजी राज्य शासनाकडे झालेल्या बैठकीत निर्देश प्राप्त झाले. हे निर्देशही संपूर्ण राज्यासाठी देण्यात आले होते. या प्राप्त निर्देशानुसार छायाचित्रे समाविष्ट करुन योग्य त्या सुधारणा करता याव्यात म्हणून जनजागृती विषयक कामकाज तातडीने थांबवण्यात आले. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मंजूर छायाचित्रे ६ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिकेला प्राप्त झाली.

ही छायाचित्रे समाविष्ट करून जनजागृती विषयक कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. शासनमान्य छायाचित्रांसह होर्डिंग्ज, बस थांब्यावरील जाहिराती महापालिकेने प्रकाशित केल्या आहेत. ८ ऑगस्ट २०२२ पासून वृत्तपत्रांमध्ये टप्प्याटप्प्याने जाहिराती प्रकाशित होत आहेत. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या समाजमाध्यमांवर देखील पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मंजूर छायाचित्रांसह जनजागृती करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.