देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास सज्ज झाला आहे, तर काहीजण एका दिवसाची सुट्टी टाकून ‘लाँग वीकेंड’ म्हणजेच गुरुवार ते रविवार असा बाहेरगावी फिरायचा बेत ठरवत असतील. ही ‘लाँग वीकेंड’ पद्धत आताची नाही, तर बहुदा इंग्रजांनीच आपल्याला लावून दिली असावी.
स्वातंत्र्यदिनाची सुट्टी दोन दिवस
याचे कारण म्हणजे देश स्वतंत्र झाला तेव्हा १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचे ठरले. १५ ऑगस्टला नेमका शुक्रवार आला आणि ब्रिटिश अधिकाऱ्याने आदेश काढले की कामगारांना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी १५ (शुक्रवार) आणि १६ ऑगस्ट (शनिवार) अशी दोन दिवसांची भरपगारी सुट्टी जाहीर करावी.
(हेही वाचा – Retail Inflation : जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर ३.५४ टक्क्यांवर)
भरपगारी सुट्टी
मुंबई राज्याच्या राजकीय आणि सेवा खात्याचे मुख्य सचिव यांच्यावतीने जे. चावेस यांनी केंद्र शासनाचा २९ जुलैच्या एका अधिसूचनेचा आधार घेत १२ ऑगस्ट १९४७ या दिवशी दोन दिवसाच्या सुट्टीचे आदेश मुंबई राज्यासाठी काढले. त्यानुसार सर्व शासकीय रोजंदारी मजूर म्हणून शासकीय सेवेत असणाऱ्या कामगारांना सलग दोन दिवस भर पगारी सुटी द्यावी, तसेच अन्य ज्याना सुटी देणे शक्य नाही, अशा कामगारांना त्या दिवसाची भरपगारी सुटी नंतर देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
अशाच प्रकारे चावेस यांनी आणखी एका आदेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिनासाठी खादीच्या झेंडे पुरवण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी करावी तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिनी परेड आयोजित करावी, अशा सूचना चावेस या इंग्रज अधिकाऱ्याने दिल्या होत्या.
(हेही वाचा – Independence Day Sale : विस्ताराने १,५७८ रुपयात प्रवास करण्याची संधी)
उमेश काशीकर यांचे संशोधन
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे शासकीय निवासस्थान असलेल्या राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, ज्यांनी गेली अनेक वर्षे विविध राज्यपाल जवळून पाहिले आहेत त्यांनी आपले शासकीय कामकाज सांभाळत काही विषयांवर संशोधन केले. त्यात त्यांना काही जुन्या कार्यालयीन आदेश, शासकीय अधिसूचनांचा दस्तऐवज सापडला. आणि हा ठेवा काशीकर यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ‘हिंदुस्थान पोस्ट’शी त्यांनी खास बातचीत केली आणि देश पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापूर्वी आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनापर्यंत मुंबई राज्याच्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community