मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य चांगलेच चर्चेत आले. या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाई झाली, तरी सुद्धा या दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणाचा आपला निर्धार काही सोडला नाही. त्यानंतरही राणा दाम्पत्याने अनेक ठिकाणी हनुमान चालिसा पठण केले. पण एका फेसबूक लाईव्हमध्ये आमदार रवी राणा हे चक्क हनुमान चालिसा विसरले. त्यानंतर त्यांची नेटक-यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.
राणांची उडाली तारांबळ
राज्यसभेत देवेंद्र फडणवीस यांच्या जादुई खेळीने भाजपचा मोठा विजय झाला. या निवडणुकीत भाजपला समर्थन देणा-या आमदार रवी राणा यांनी या निकालाचे विश्लेषण करण्यासाठी एक फेसबूक लाईव्ह केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला पण हनुमान चालिसा म्हणताना मात्र त्यांची तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले.
(हेही वाचाः Presidential Election: भाजपतर्फे मोर्चेबांधणी सुरू, ‘या’ 2 नेत्यांवर सोपवली जबाबदारी)
नेटक-यांनी केले ट्रोल
फेसबूक लाईव्हमध्ये हनुमान चालिसा मधील श्लोकांचे पठण करताना राणा यांचे शब्दोच्चार चुकत होते, तर काही ओळींचा संदर्भ देखील त्यांना नीट देता आला नसल्याचे नेटक-यांच्या लक्षात आले. त्यामुळे नेटक-यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आणि राणा यांच्यावर नाईलाजाने ही पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की ओढवली. पण हा व्हिडिओ काही जणांनी सोशल मीडियावर व्हायरल केली असून, राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
Join Our WhatsApp Community