2047 पर्यंत भारत बनणार विकसित देश; पंतप्रधानांचे वक्तव्य

233

भारत 2047 पर्यंत विकसित देश बनेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान गेल्या काही दिवसांपासून प्री-बजेट वेबिनारला संबोधित करत आहेत. त्याअंतर्गत शनिवारी ‘पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक’ या विषयावरील अर्थसंकल्पीय वेबिनारला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, यंदाचा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा क्षेत्राला नवी ऊर्जा देणारा आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत पायाभूत सुविधांचा विकास हा नेहमीच महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. पायाभूत विकास ही अर्थव्यवस्थेची प्रेरक शक्ती आहे आणि या मार्गाचा अवलंब करून भारत 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे लक्ष्य साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला नव्या उंचीवर नेईल. देशात पहिली दशके अशी विचारसरणी होती की, गरिबी ही भावना आहे आणि या विचारसरणीमुळे तत्कालिन राज्यकर्त्यांनी देशातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली नाही. परंतु, आमच्या सरकारने देशाला या विचारातून बाहेर काढले आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर विक्रमी गुंतवणूक केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

( हेही वाचा: राऊतांची जीभ पुन्हा घसरली; आता निवडणूक आयोगाला दिली शिवी )

भारतात आज घडीला राष्ट्रीय महामार्गांचे सरासरी वार्षिक बांधकाम 2014 च्या तुलनेत दुप्पट झाले आहे. देशात 2014 पूर्वी दरवर्षी 600 मार्ग किमी रेल्वे लाईनचे विद्युतीकरण केले जात होते आणि आज हा आकडा 4 हजार किमी मार्गावर आला आहे. तसेच 2014 च्या तुलनेत विमानतळांची संख्या 74 वरून 150 पर्यंत वाढल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.