दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर याप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. दरम्यान, केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लक्ष्मी आणि गणपती यांची प्रतिमा भारतीय चलनावर छापण्याची मागणी केली आहे.
काय म्हटले पत्रात
पत्रात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, देशातील 130 कोटी लोकांची इच्छा आहे की, भारतीय चलनावर एका बाजूला गांधी आणि दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा. तर केजरीवालांच्या या मागणीवरून चांगलाच गदारोळ सुरू झाला असून भाजप सह इतर राजकीय पक्ष सातत्याने केजरीवालांवर हल्लाबोल करत आहे.
मैंने प्रधानमंत्री जी को पत्र लिखकर 130 करोड़ भारतवासियों की ओर से निवेदन किया है कि भारतीय करेंसी पर महात्मा गांधी जी के साथ-साथ लक्ष्मी गणेश जी की तस्वीर भी लगाई जाए। pic.twitter.com/OFQPIbNhfu
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 28, 2022
शुक्रवारी पंतप्रधानांना पाठवलेले पत्र ट्विट करत केजरीवाल यांनी लिहिले आहे की, मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली आहे की, महात्मा गांधी आणि लक्ष्मी, गणपतीचा फोटो भारतीय चलनी नोटांवर लावावे. पत्रात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, आज देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही भारताची गणना विकसनशील आणि गरीब देशांमध्ये केली जाते. आज आपल्या देशात इतके गरीब का आहेत? पुढे त्यांनी असेही लिहिले आहे की, एकीकडे आपल्या सर्व देशवासियांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे आणि दुसरीकडे आपल्याला देवाच्या आशीर्वादाचीही गरज आहे जेणेकरून आपले प्रयत्न फलदायी ठरतील.
(हेही वाचा – मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट हॅक, आयुक्तांनी मुंबईकरांना केले सतर्क)
योग्य धोरण, मेहनत आणि देवाचा आशीर्वाद याच्या संगमातूनच देशाची प्रगती होईल. त्यांनी जाहीरपणे मांडलेल्या या मागणीला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे. याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा असल्याचेही त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.