युक्रेन युद्धासाठी रशियन सैन्यात समाविष्ट झालेले भारतीय सुखरूप मायदेशी परतणार आहेत. मीडिया रिपोर्ट्समधील सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की, रशिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले.
गेल्या महिन्यात या युद्धात २ भारतीयांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने रशियाकडे सैन्यात भरती झालेल्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी केली होती. हे दोन्ही देशांमधील भागीदारीसाठी चांगले नसल्याचे सरकारने म्हटले होते.
(हेही वाचा – Maharashtra Administrative Tribunal : न्यायदान प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न प्रशंसनीय – मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय )
२२व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी सोमवारी सायंकाळी ५ वाजता मॉस्कोला पोहोचले. येथे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्यासाठी खासगी डिनरचे आयोजन केले होते.
पुतिन म्हणाले, ‘तुमचे मनापासून स्वागत आहे. तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. मंगळवारी आपल्यात औपचारिक चर्चा होणार आहे. आज आपण घरच्या वातावरणात अनौपचारिकपणे त्याच गोष्टींवर चर्चा करू शकतो. मोदी म्हणाले, ‘तुम्ही मला तुमच्या घरी बोलावले. मंगळवारी, (९ जुलै) सायंकाळी एकत्र गप्पा मारायचे ठरवले. मला तुमच्या घरी बोलावल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.
भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होणार
तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी मॉस्कोमधील वनुकोवो-२ आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले. यावेळी रशियन सैन्याने भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवली. मंगळवारी, (९ जुलै) पंतप्रधान मोदी भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. मोदी मंगळवारी मॉस्कोमध्ये राहणाऱ्या भारतीय प्रवासींच्या समुहालाही संबोधित करणार आहेत.
भारतातून होणारी निर्यातही वाढेल
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी TASS या वृत्तसंस्थेला सांगितले की, अध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात मंगळवारी दुपारी बैठक सुरू होईल. ते म्हणाले की, हे खाजगी संभाषण असेल. पीएम मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात आज होणाऱ्या बैठकीत अनेक आर्थिक घोषणा केल्या जाऊ शकतात तसेच नवीन व्यापार मार्गाबाबत दोन्ही देशांमध्ये करार होण्याची शक्यता आहे. दोन्ही देश परस्पर व्यापार वाढवण्यासाठी नवीन करार करू शकतात. हा व्यापारी मार्ग भारताला इराणच्या चाबहार बंदरातून मध्य आशियामार्गे रशियाशी जोडेल. हा करार पूर्ण झाल्यास रशियातून भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आणि इतर आयात मालाच्या किमती घसरतील. याशिवाय भारतातून होणारी निर्यातही वाढेल.
रशियासोबत नवीन संरक्षण करार जाहीर होऊ शकतात
भारत आणि रशियामध्ये नवीन संरक्षण करार होऊ शकतात. भारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्रांचा आणि उपकरणांचा मोठा भाग आजही रशियाकडून येतो. दोन्ही देश संयुक्त उपक्रमाद्वारे भारतात शस्त्रास्त्रे आणि उपकरणे निर्मितीसाठी काम करत आहेत. मॉस्कोस्थित थिंक टँकच्या मते, नवीन हवाई संरक्षण प्रणाली, सुखोई 30MKI आणि Ka-226 हेलिकॉप्टरच्या परवानाप्राप्त उत्पादनासाठी रशिया आणि भारत यांच्यात करार निश्चित केला जाऊ शकतो.
शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी दोन्ही देशांमध्ये परस्पर करार
युक्रेन युद्धानंतर रशियाकडून आयात केलेले सुटे भाग देण्यासही विलंब होत आहे. अशा स्थितीत भारताला मिळालेली शस्त्रे आणि उपकरणे वेळेवर मिळावीत यासाठी भारत प्रयत्न करेल, अशा स्थितीत भारतातील सुटे भाग आणि शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी दोन्ही देशांमध्ये परस्पर करार होऊ शकतो. .
स्वस्त तेलाची हमी मिळू शकते
युक्रेन युद्धानंतर रशियाकडून भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. रशियावर पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधानंतर रशियाने कच्च्या तेलाच्या किमती कमी केल्या होत्या. निर्बंध असूनही भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करणे सुरूच ठेवले. दोन वर्षांच्या युद्धानंतरही रशिया भारताला कच्च्या तेलाची स्वस्तात विक्री करत आहे. अशा स्थितीत तेलाची कमतरता भासू नये यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
हेही पहा –