वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरील धडा पाठ्यक्रमातून वगळून, त्यांचे विधानसभेच्या सभागृहातील चित्र काढून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सावरकरांची महती लपवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती समाजासमोर येणारच आहे. कोंबडे झाकल्यामुळे सूर्य उगवण्याचे थांबत नाही. हा सगळा राजकीय खेळखंडोबा सुरु आहे. स्वतः इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांचा सन्मान केला होता, हे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार विसरले आहे. केवळ भाजपाला विरोध करण्यासाठी वीर सावरकर (Veer Savarkar) यांना विरोध करणे हास्यास्पद आणि तितकेच निंदनीय आहे, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कर्नाटक सरकारवर घणाघाती टीका केली.
काँग्रेस पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल
सवंग लोकप्रसिद्धीसाठी काँग्रेस कायम वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा वापर करत असते. जेव्हा जेव्हा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अस्थिर वाटू लागते तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून चर्चेत राहतात. त्यांचीच री काँग्रेसचे सरकार असलेले कर्नाटक सरकार ओढत आहे. कर्नाटकात २०२२मध्ये भाजपचे सरकार होते तेव्हा तेथील विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची प्रतिमा लावली होती, आता ती प्रतिमा काढण्याचा निर्णय तेथील काँग्रेस सरकारने घेतला आहे. यावर बोलताना रणजित सावरकर पुढे म्हणाले की, अशा प्रकारे वीर सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल. हे लोक टिपू जयंती साजरी करतात पण ते वीर सावरकर (Veer Savarkar) या स्वातंत्र्यवीराची महती कमी करतात. वीर सावरकरांच्या तुलनेत नेहरूंचे स्वातंत्र्य चळवळीत काय योगदान होते?, असा सवाल रणजित सावरकर यांनी विचारला.
Join Our WhatsApp Community