Congress : इंदिरा इज इंडिया म्हणजेच ‘भारत विरुद्ध इंडिया’

164
  • माधव भांडारी

अलीकडेच बेंगळूरू येथे सोनिया व राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत देशभरातील २६ लहान लहान पक्षांचे नेते सामील झाले होते. ‘मोदी व भाजपा यांना पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचा’ निर्णय त्यांनी या बैठकीत केला. आजवर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील आघाडीला ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ (United Progressive Alliance UPA) म्हटले जात असे. बेंगळूरूच्या बैठकीत त्यांनी नवे नाव स्वीकारण्याचा निर्णय घेतला व आपल्या लांबलचक इंग्रजी नावाचे लघुरूप I.N.D.I.A. असल्याचे जाहीर केले. ही घोषणा राहूल गांधींनी केली. त्यावेळेला ते एकटे होते. बैठकीत सहभागी झालेल्या अन्य पक्षांच्या नेत्यांपैकी कोणीही त्या पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हते. ह्या सर्व घडामोडींचे अर्थ लक्षात घेतले पाहिजेत.

काँग्रेस प्रणित आघाडीचे नेतृत्व एकट्या राहूल गांधींकडे

सर्वात पहिला मुद्दा म्हणजे नेतृत्व विषयातून सोनिया गांधींनी उरले सुरले अंगही काढून घेतले आहे. आता या काँग्रेस प्रणित आघाडीचे नेतृत्व एकटे राहूल गांधी करणार आहेत. त्यांची मानसिकता व कार्यपद्धती कोणालाही बरोबर घेऊन चालण्याची नाही. ‘मी मालक आहे, तुम्ही सर्व माझे चाकर आहात’ ह्या भूमिकेत ते सतत वावरत असतात. त्यामुळे त्यांना स्वत:च्या पक्षाच्या अध्यक्षांना देखील पत्रकार परिषदेत बरोबर घेण्याची गरज वाटली नाही, शरद पवार, नितीशकुमार वगैरे अन्य पक्षांचे नेते तर खूपच दूर राहिले.

India राष्ट्रनामाचा राजकीय गैरवापर

दुसरा मुद्दा: भारताचे संविधान, भारतीय कायदे यांची राहूल गांधी यांना माहिती नाही व ते या गोष्टींना काहीही किंमत देत नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आले. ‘प्रतिके व नामे (गैरवापर प्रतिबंधक) कायदा – १९५० (Emblems and Names – Prevention of Improper Use Act – 1950) नावाचा कायदा भारतात गेली ७३ वर्षे अस्तित्वात आहे. राहूल गांधींच्या पणजोबांनी लागू केलेल्या या कायद्याचा वापर आजवरच्या सर्व काँग्रेस सरकारांनी वारंवार केलेला आहे. पण, भारतीय संविधान व कायदा अमान्य असणाऱ्या राहूल गांधींना अनेक वर्षे खासदार राहून देखील ह्या कायद्याची जाणीव नाही. म्हणून ते India ह्या राष्ट्रनामाचा राजकीय गैरवापर बिनदिक्कतपणे करायला निघाले आहेत.

(हेही वाचा Asaduddin Owaisi : ना राहुल गांधी, ना ममता बॅनर्जी, ना अखिलेश यादव मुसलमानांचे सहानुभूतीदार; काय म्हणाले ओवैसी?)

नव्या नावाचा इतिहास

तिसरा मुद्दा : आणीबाणीच्या काळात काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष देवकांत बारुआ यांनी ‘Indira is India’ ही कुप्रसिद्ध घोषणा दिली होती. प्रचंड टीका होऊनसुद्धा ती त्यांनी मागे घेतली नव्हती किंवा ‘आमची ही भूमिका नाही’ असे खुद्द इंदिरा गांधी व काँग्रेसने म्हटले नव्हते. राहूल गांधी आज त्याच मानसिकतेत आहेत. ‘मी म्हणजे India’ अशीच त्यांची भावना आहे.

चौथा मुद्दा : बैठकीत सामील झालेल्या २६ पक्षांच्या नेत्यांपैकी अन्य कोणीही या विषयावर अद्याप बोललेले नाहीत. हे मौनच पुरेसे बोलके आहे. साधारणपणे १९८५-८६च्या सुमाराला शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी ‘India Vs भारत’ हा सुप्रसिद्ध मुद्दा मांडला होता. तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वीकारलेली धोरणे व केलेली अनेक वक्तव्ये देशातील वास्तवापासून कैक मैल दूर होती. त्यावरून शरद जोशी यांनी तो मुद्दा मांडला होता. ज्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात रहाणाऱ्या ग्रामीण, सर्वसामान्य माणसाची काहीही माहिती नाही, भारतीय संस्कृती माहिती नाही, जे केवळ देखाव्यासाठी सफेद कुर्ता पायजमा वापरत असत, कामचलाऊ हिंदी बोलत असत पण प्रत्यक्षात त्यांना फक्त इंग्रजी भाषाच समजत असे व म्हणून ते स्वत:ला महान समजत असत अशा मंडळींच्या हातात त्यावेळेला भारताचा कारभार होता. हे कारभारी स्वत:ला ‘India’ समजत असत. त्यांच्या अस्तित्वाच्या बाहेर असलेला शेतकरी, कष्टकरी, कामगार व अन्य सर्व म्हणजे त्यांच्या भाषेत ‘That xxxxxx Bharat’ होता ज्याची दखल घेण्याची काहीच गरज त्यांना वाटत नव्हती. कारण पाश्चात्य जगाला India माहित आहे, ‘भारत’ नाही असा त्यांचा समज होता. राहूल गांधी आपल्या पित्याच्या काळातील त्याच परिभाषेचा वापर करायला निघाले आहेत. कारण अमेरिका व यूरोपला ‘India’ माहिती आहे, ‘भारत’ नाही, आपल्याला मदत करण्यासाठी तेच देश ‘India’च्या राजकारणात हस्तक्षेप करून मोदी व भाजपाला सत्तेवरून पदच्युत करणार आहेत व आपल्या मालकीची गादी आपल्याला परत बहाल करणार आहेत असा राहूल गांधींचा ठाम समज आहे. ‘Indira is India’ या मानसिकतेची दुसरी बाजू म्हणजे ‘India Vs भारत’! पुन्हा एकदा हा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न राहूल गांधी करू पहात आहेत, असा या घोषणेचा स्पष्ट अर्थ आहे.

राहूल गांधीचे नेतृत्व अमान्य

आघाड्यांचे राजकारण काँग्रेसला कधीच मानवले नव्हते. सोनिया गांधींनी तर अशा आघाडीला सुरुवातीला ठाम नकार दिला होता पण नंतर राजकीय वास्तव स्वीकारून त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी UPA उभी केली व दहा वर्षे चालवली. मात्र राहूल गांधींचे वागणे आघाड्यांच्या राजकारणाला पोषक नाही. ‘मी राहूल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करू शकणार  नाही’ असे शरद पवारांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. नितीशकुमार, ममता बानर्जी हे सर्व स्वत:च्या ताकदीवर उभे असलेले नेते आहेत. मते मिळवण्यासाठी त्यांना राहूल गांधींची गरज नाही आणि काही उपयोगही नाही. २०१९च्या निवडणुकीत राहूल गांधींच्या UPAला जेमतेम १७% तर भाजपा प्रणित NDAला ३९% च्या वर मते मिळाली होती.

NDA चा उद्देश  प्रत्येक व्यक्तीचा विकास, प्रगती

‘कोणालाही सत्तेवरून खाली खेचण्यासाठी किंवा केवळ सत्ता मिळवण्यासाठी आम्ही राजकारण करत नाही, तर देशातील  प्रत्येक व्यक्तीचा विकास, प्रगती करून देश संपन्न व समर्थ करण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत’ ही १९५१ साली घेतलेली भूमिका आजही कायम आहे. काँग्रेस मात्र ‘मोदी व भाजपाला पराभूत करणे एवढ्या एका उद्देशासाठी काम करते आहे’ असे त्यांच्या अध्यक्षांनीच हल्ली जाहीर केले आहे. भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांची ही दोन धोरणे व आघाड्या करताना दोघांनीही स्वीकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका जनतेसमोर आहेत. त्यांचे मूल्यमापन करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता जनतेमध्ये आहे. हे मूल्यमापन करताना अर्थातच गेल्या नऊ वर्षांमधला विकास, सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात होत असलेला बदल व जगात भारताला मिळू लागलेला सन्मान हे सगळे मुद्दे विचारात घेतल्याशिवाय जनता रहाणार नाही. भारतीय जनता योग्य राजकीय निर्णय घेण्यात सक्षम आहे, त्यासाठी ती यूरोप अमेरिकेच्या अथवा चीन रशियाच्या तोंडाकडे बघत नाही, हा अनुभव २०२४ मध्ये आपण पुन्हा एकदा घेणार आहोत.

NDA म्हणजे  विकासाभिमुख भारत

भाजपा प्रणित NDA पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून अस्तित्वात आहे. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५२ साली या आघाडीच्या राजकारणाचा पाया घातला. पहिल्या लोकसभेत अस्तित्वात आलेली ही आघाडी आजतागायत अस्तित्वात आहे व नीट सुरु आहे. सध्या ह्या आघाडीत ४३ लहानमोठे पक्ष सामील असून १९ राज्यांमध्ये ती सत्तेवर आहे. १९८० नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्व समावेशक धोरणातून ही आघाडी विस्तारत गेली. आता मोदीजींनी विकासाभिमुख भारत हा नवा पैलू या राजकारणाला जोडला. विकसित भारत देश जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानी पोहचवण्यासाठी देशातील अन्य पक्षांना सोबत घेण्याचे धोरण राष्ट्रीय लोकशाही आघाडीने स्वीकारले आहे. म्हणून मोदींनी NDA ची नवी व्याख्या सांगताना विकासावर देत असलेला भर अधोरेखित केला. रालोआ – NDA ला आपले नाव बदलण्याची आवश्यकता मात्र वाटत नाही, कारण आपल्या सर्वसमावेशक धोरणावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे.

(लेखक महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.