वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच पेटले आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात कोणताही सामंज्यस्य करार झाला नाही. याबाबत केवळ चर्चा झाली कोणतेच लेखी व्यवहार झाले नाहीत, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडले. पॅकेज वेळेत दिले असते तर हे झालेच नसते, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सध्या विरोधक करत असलेले दावे फेटाळून लावले.
दरम्यान संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणू अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचेही सामंत यांनी सांगितले. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला यावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं सर्व खापर महाविकास आघाडीवर फोडले. गेली दोन वर्षे कंपनीच्या कामाला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो मिळाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं आहे.
(हेही वाचा – साधू मारहाण प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन, मागवला अहवाल)
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला हे मला कालच समजले. उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि उद्योग विभाग एकमेकांशी संलग्न असणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी म्हटले तर यासंबंधी आम्ही धोरण तयार करत आहोत, येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. तसेच नागपूरमध्येही टाटा एअरबसचा प्रकल्प होणार असल्याची माहिती त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.