रोजगार हमी योजनेच्या कामावर उपस्थित असलेल्या आदिवासी मजुरांना दोन दिवसांपूर्वीचे शिळे भोजन देण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार धारणी तालुक्यातील रोहणीखेडा येथे उघडकीस आला. त्यामुळे मजुरांनी हे जीवघेणे भोजन अक्षरशः फेकून देत जमिनीत पुरले.
जेवणाला दुर्गंधी येत होती
गेल्या पंधरा दिवसांपासून रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था कामगार आयुक्तालयाकडून केली जाते. राज्य शासनानेच तसा निर्णय घेतला आहे. कामावर उपस्थित असलेल्या सर्व मजुरांना दुपारच्या वेळी जेवणाची सुटी देत भोजन पुरवणे, हा त्यामागचा उद्देश आहे. परंतु या अभिनव योजनेला शिळ्या अन्नामुळे गालबोट लागले आहे. मजुरांना पुरवण्यात आलेले वरण, भात, पोळी आणी भाजी तब्बल दोन दिवस आधीची होती. प्राप्त माहितीनुसार, परतवाडा येथे शिजवून जेथे काम सुरू आहे, त्या ठिकाणी हे जेवण आणले गेले. रोहणीखेडा-परतवाडा हे अंतर ११० किलोमीटर आहे. त्यामुळे साधारणत: तीन ते साडेतीन तास लागतात. दरम्यान, भोजन घेऊन एक वाहन रविवारी दुपारी रोहणीखेडा येथे पोहोचले. भोजन वाटप करत असताना त्यातून दुर्गंधी येत होती. वरणाला फेस यायला लागल्यामुळे मजुरांनी सर्व पदार्थ फेकून दिले, असे प्रहार संघटनेचे दिलीप चतुर यांनी सांगितले.
(हेही वाचा अण्णा हजारेंचे धक्कादायक वक्तव्य! स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही आलीच नाही…)
गावातच मनरेगाची कामे स्वीकारली
त्याचवेळी या प्रकाराची कामगार मंत्रालयाकडे तक्रार केली जाईल, असे महाराष्ट्र जल क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्नालाल दारसिंबे यांनी सांगितले. मेळघाटातील रोजगार हमी कायद्याच्या कामावर लक्षणीय उपस्थिती आहे. मध्यंतरी दीड दोन वर्षे कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील आदिवासी कुटूबांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, कामासाठी त्यांची भटकंती सुरू आहे. ती टळावी म्हणून अनेकांनी गावातच मनरेगाची कामे स्वीकारली आहे. परंतु आजचा प्रकार पाहिल्यानंतर मजुरांसह सर्वांचाच पुरता हिरमोड झाला.
Join Our WhatsApp Community