नालेसफाईच्या कामाची चौकशी करा! काँग्रेसची मागणी

मुंबईत नालेसफाई झालीच नाही, हे पहिल्या पावसात दिसून आले. दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई करूनही पाणी तुंबते, असे भाई जगताप म्हणाले.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली तरी, मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची सुरुवात केली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, मालमत्ता करवाढीचा घेतलेला निर्णय, नालेसफाई झालेला चालढकलपणा, असे मुद्दे उपस्थित करत काँग्रेसने नालेसफाईसाठी खर्च झालेले १०० कोटी रुपये गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे या खर्चाचा हिशोब द्यावा, असे सांगत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेने मालमत्ता करवाढीचाही घाट घातला होता!

मुंबईतील विविध समस्यांबाबत सोमवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावर पडलेले खड्डे याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यांसाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. महापालिकेने मालमत्ता करवाढीचाही घाट घातला होता. मात्र याला मुंबईकरांसह काँग्रेसने जोरदार विरोध केल्यामुळे करवाढीचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. कोरोनाच्या महामारीत काँग्रेस करवाढ लादू देणार नाही, असे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.

(हेही वाचा : मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये आढळल्या अँटिबॉडीज )

नालेसफाईसाठी खर्च झालेले 100 कोटी रुपये गेले कुठे?

मुंबईत नालेसफाई झालीच नाही, हे पहिल्या पावसात दिसून आले. दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई करूनही पाणी तुंबते. त्यामुळे नालेसफाईसाठी खर्च झालेले 100 कोटी रुपये नेमके कुठे गेले, याची महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी करत जगताप यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. प्रभाग पुनर्रचना करण्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल निवडणूक आयोगाने प्रभाग पुनर्रचना करणार असल्याचे स्पष्ट केल्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो, असेही जगताप यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here