विक्रांतसाठी जमा केलेला निधी गेला कुठे? या प्रश्नावर सोमय्यांकडे उत्तर नाहीच…

94

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करोडोंचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आता यावर सोमय्यांनी आपली बाजू मांडली आहे. विक्रांत प्रकरणी एक रुपयाचाही घोटाळा झाला नाही. मी दमडीचाही घोटाळा केला नाही. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले.

ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढत राहणार

बुधवारी रात्री उशिरा माजी सैनिकाकडून किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याचे विचारल्यावर, मला अद्याप एफआयआरची काॅपी मिळाली नसल्याचे, सोमय्यांनी सांगितले. तसेच, संजय राऊत यांनी आरोप केले पण अद्याप ते कोणत्याही प्रकारचा पुरावा देऊ शकले नाहीत. माझे उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की, त्यांच्याकडे असणारी माहिती त्यांनी द्यावी, मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. मी चौकशीला तयार असल्याचे सोमय्या म्हणाले. पोलिसांच्या कोणत्याही चौकशीचे मी स्वागत करत असल्याचही सोमय्या म्हणाले. दरम्यान, ठाकरे सरकारचे घोटाळे मी बाहेर काढत आहे आणि पुढेही काढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पैसे गेले कुठे? उत्तर नाहीच

विक्रांतसाठी गोळा केलेला निधी राजभवनात जमा करणार असल्याचे सोमय्या म्हणाले होते. मात्र कोणताही निधी राजभवनात जमा केला नसल्याची माहिती राजभवनाकडून दिली आहे. त्याबद्दल विचारले असता, सोमय्यांनी प्रश्न टाळले आणि थेट गाडीत बसून निघून गेले.

( हेही वाचा: २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हा, एसटी कामगारांना न्यायालयाचा आदेश )

काय म्हणाले होते राऊत 

संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले की, सोमय्या यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्यांचा अपमान केला असून त्यांची कृती देशद्रोहीपणाची आहे. मात्र, देशभक्तीचे गीत गाणारे, देशभक्तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणाऱ्यांची बाजू घेतली. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी लोकांकडून जमा केलेला निधी किरीट सोमय्यांनी हडप केला आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्यांचा असा अपमान करणाऱ्या किरीट सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चार जोडे हाणले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.