सोमय्यांनी केला व्हिडीओ जारी, पोलीस पोहचले चौकशीला घरी

133
‘आयएनएस विक्रांत’ ला वाचवण्यासाठी निधी संकलन करून त्याताल ५८ कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी स्वतःसाठी वापरले, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सत्र न्यायालयाने सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या असताना सोमय्या यांनी स्वतःचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला आहे. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर तासाभरातच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस सोमय्या यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

सोमवारी, ११ एप्रिल रोजी सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला, मंगळवारी, १२ एप्रिल रोजी सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांबाबत महत्वाचा दावा केला आहे. गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या लपून बसल्याचा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, असेही राऊत म्हणाले.

काय म्हणाले किरीट सोमय्या? 

किरीट सोमय्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्यांनी व्हिडीओ शेअर करत राऊत यांना लक्ष्य केले आहे. तसेच तुम्ही कितीही खोटे आरोप केले, तरी आम्ही ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने विक्रांत युद्धनौकेला ६० कोटी रुपयांत भंगारमध्ये विकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा आम्ही निषेध केला होता, भाजपने १० डिसेंबर रोजी एक तासाभराचा, सांकेतिक प्रतिकात्मक निधी संकलनाचा कार्यक्रम केला. त्यामध्ये ११ हजार रुपये जमले होते. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात भाजप- शिवसेना खासदारांनी १७ डिसेंबरला स्वत: राष्ट्रपतींना भेटून ही माहिती दिली. तसेच राज्यपालांना माहिती दिली होती, १० वर्षानंतर संजय राऊत सांगतात की, किरीट सोमय्यांनी ५८ कोटी रुपये ढापले. पण एक कागद नाही, एक पुरावा नाही, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले. तसेच याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात जात आहोत, तिथे ही सगळी माहिती ठेवणार असल्याचेही सोमय्यांनी व्हिडीओतून म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.