उद्धव ठाकरेंनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवल्याचा आरोप वारंवार केला जात असताना, उद्धवसेनेचे उपनेते भास्कर जाधव यांनी त्याची कबुली दिली आहे. नागपूर विधिमंडळाबाहेर जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांच्यातील संवाद माध्यमांच्या कॅमेऱ्याने अचूकपणे कैद केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : राजधानी ट्रेनच्या जेवणाबाबत रेल्वेकडे आल्या ६,३६१ तक्रारी; प्रवाशांच्या सेवेसाठी आता करणार विशेष उपाययोजना)
सीमावादाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाकरे गटाचा राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख केला. ‘आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना’, असे ते म्हणाले.
त्यावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही होकारार्थी मान डोलावली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संतोष धुरी यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटावर चौफेर टीका होऊ लागली आहे.
त्यात चुकीचे काय?- केसरकर
जयंत पाटलांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. राष्ट्रवादीची शिवसेना झाली हे म्हणणे काही चुकीचे नाही. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसचे लोक जवळचे वाटतात. त्यांना आपली माणसे नकोशी झाली आहेत. आम्ही परत येतो पण दोन्ही काँग्रेसला सोडा असे त्यांना आम्ही सांगत होतो; पण तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुम्ही देखील निघून जा, असे म्हटल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.
#जयंत_पाटील म्हणाले, आमची शिवसेना #राष्ट्रवादीची_शिवसेना, #भास्कर_जाधव यांनीही दिला दुजोरा @shewale_rahul #hindusthanpost pic.twitter.com/ePvdD6k0jH
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 24, 2022