देशात आणि जगभरात आज मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला जात आहे. महिला दिनाच्या दिवशी महिलांचे विविध क्षेत्रांतील महत्त्व अधोरेखित केले जाते. महिला दिनाचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट करत महिलांना आवाहन केले आहे.
( हेही वाचा: जगभरात महिला दिन साजरा होत असताना मंत्रिमंडळात एकही महिला नाही; अजित पवारांनी व्यक्त केली खंत )
‘हे’ चित्र आनंददायी
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये महिलांच्या प्रगतीचा उल्लेख केला आहे. आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मन: पूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, सर्वच क्षेत्रात स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. ग्रामीण भागातील असो की, शहरी भागातील इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वत:च करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत. जिथे जातील तिथे स्वत:चा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे, असे या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत.
महिलांनो राजकारणात या
राज ठाकरेंनी महिला वर्गाला मोठ्या संख्येने राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. आता स्त्रियांनी राजकारणातदेखील मोठ्या प्रमाणात यायला हवे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. हे साध्य करायचे असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करणा-या स्त्रियांनी राजकारणात यावे, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community