शिवसेनेत फूट पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने उद्धव गटासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नसला, तरी ‘प्रबोधन’ डॉट कॉमच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण पाठविले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन आंबेडकरांच्या हस्ते होणार असून, यानिमित्ताने दोन्ही नेते एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे ही नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
( हेही वाचा : मुंबई पोलीस दलात मोठा फेरबदल; उपायुक्तांच्या नियुक्त्या )
शिवसेनेचे हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्व असून, आम्हाला ते मान्य आहे, अशी भूमिका वंचितने घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि आंबेडकर यांच्या एकत्र येण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आजमितीला वंचित आणि उद्धवसेना नव्या राजकीय मित्राच्या शोधात आहेत. भाजपशी फारकत घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाळ जुळवली, तर २०१९ मध्ये एमआयएमशी युती तोडल्यानंतर वंचितला सोबती मिळालेला नाही. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना, राष्ट्रवादीने आघाडीची वाट पाहत बसू नका, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. तर मुंबई पालिका निवडणुकीत कॉंग्रसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक पहायला मिळणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेनेचा मित्रपक्ष राष्ट्रवादीचा यात अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादीला सोबत घेण्यास वंचितचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसारख्या मोठ्या पक्षाची साथ सोडून ठाकरे आंबेडकरांशी युती करणार का, की तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेतले जाणार, याची उत्सुकता आहे.
कधी एकत्र येणार?
प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण केले जाणार आहे. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त सुभाष देसाई यांनी दिली. प्रबोधनकारांची सर्व पुस्तके, पुस्तकबद्ध न झालेले साहित्य, विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख त्यांनी पुस्तकांसाठी लिहिलेल्या प्रस्तावना या संकेतस्थळावर वाचता येतील. प्रबोधनकारांचे थोडक्यात चरित्रही मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा भाषांमध्ये उपलब्ध होईल.
…तर देशाचे राजकारण बदलेल – राऊत
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हातात हात घालून काम केले. बाबासाहेबांना महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी प्रचंड प्रेम होते, त्यांची महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी रोखठोक-प्रखर मते होती, जी इतिहासात नोंदली गेली. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होण्याची जेव्हा विनंती केली, तेव्हा बाबासाहेबांनीही प्रबोधनकारांच्या विनंतीला मान दिला. त्यामुळे हे आजोबांचे नाते आता नातवांपर्यंत येऊन पोहोचले आहे. ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे. ती जर एकत्र आली तर राज्याचेच नव्हे, तर देशाचे राजकारण बदललेले दिसेल. प्रकाश आंबेडकर यांच्यावर महाराष्ट्राचे मनोमन प्रेम आहे. मी त्यांचा सदैव आदर करतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
Join Our WhatsApp Community