Iran Anti-Hijab Protest : इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलनात तिसरा मुत्यू

176

इराणमध्ये हिजाबच्या वादात, सेलिब्रिटी शेफ मेहरशाद शाहिदीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. वृत्तानुसार, हिजाबच्या विरोधात निदर्शनात भाग घेतल्याबद्दल त्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड फोर्सने त्याला बेदम मारहाण केल्याची बातमी आली. शाहिदीच्या 20 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी हत्या करण्यात आली होती. इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनात मागील दोन महिन्यातील ही तिसरी हत्या आहे.

पोलिसांच्या मारहाणीत झाला मृत्यू 

या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून शाहिदाच्या अंत्यसंस्काराच्या यात्रेला हजेरी लावली. शाहिदी इराणमधील खूप प्रसिद्ध शेफ होता. त्याला इराणचा जेमी ऑलिव्हर म्हणत. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने हिजाब विरोधी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यावेळी डोक्याला मार लागल्याने शाहिदीचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यासाठी त्याच्या  कुटुंबियांवर दबाव टाकण्यात आला. इराणी टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत मेहरशादच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “आमच्या मुलाचा डोक्याला दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला. पण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दबाव आमच्यावर टाकण्यात आला. इराण प्रशासनाने शेफच्या मृत्यूमध्ये कोणताही सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्याचे हात, पाय, मेंदू यांना फ्रॅक्चर झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर सर्वसामान्य जनता या घटनेसाठी इराणी प्रशासनाला दोषी ठरवत आहे. शाहिदीसाठी शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. शेफच्या मृत्यूबद्दल इराणी अमेरिकन लेखिका डॉ. नीना अन्सारी म्हणाल्या, “ते एक प्रतिभावान शेफ होते. त्याला इराणी सैन्याने निर्दयीपणे ठार मारले. दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. आम्ही हे कधीही विसरणार नाही किंवा माफ करणार नाही.

(हेही वाचा गुजरातमधील झुलता पूल पडण्यामागे काय होते कारण?)

मागील दोन महिन्यातील तिसरी हत्या 

जगभरातील काही मुस्लिम राष्ट्रांमधील महिला हिजाबच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी जोरदार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचे केंद्रस्थान इराण बनले आहे. या देशात मुस्लिम महिला आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. पोलीस बळाचा वापर करत असूनही महिला त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. पोलिसांच्या मारहाणीत १६ सप्टेंबर २०२२ रोजी महसा आमीनी हिचा मृत्यू झाला होता, तर रविवार, ९ ऑक्टोबर २०२२ रोजी १६ वर्षीय शरीना नावाच्या मुलीने बुरखा घालण्यास विरोध केला, म्हणून तिलाही पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे तिचाही मृत्यू झाला आहे. आता २०वर्षीय सेलिब्रिटी शेफ मेहरशाद शाहिदीयांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.