राज्य शासनाकडूनच लसी कमी मिळतात… मुंबई महापालिकेने दिली माहिती

राज्य शासनाकडून कमी प्रमाणात, तसेच अनियमित साठा मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे.

138

केंद्राकडून महाराष्ट्राला कोविड लसींचा साठा कमी मिळत असल्याचा कांगावा राज्य सरकारकडून सुरू असला, तरी पात्र लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता राज्य शासनाकडून प्राप्त होणारा लससाठा हा खूप कमी प्रमाणात व अनियमित होत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकार लसींच्या साठ्यांबाबत केंद्राला दोष देत असले, तरी राज्याला प्राप्त होणाऱ्या लसींच्या तुलनेत मुंबई महापालिकेला अनियमित आणि कमी प्रमाणात लसींचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईमध्ये १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ आजारासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ही मोहीम राबवण्यासाठी महापालिका व शासनाच्यावतीने ३१६ केंद्र आणि १९९ खासगी केंद्र, अशाप्रकारे ४३५ लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली. लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या लसींच्या साठ्याचे वितरण पुण्यातील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कार्यालयामार्फत महापालिकेला व इतर जिल्ह्यांना मोफत करण्यात येते.

(हेही वाचाः कोरोनाच्या दोन लसी घेतल्या असतील तर काढा लोकलचा ई-पास…कसा ते वाचा…)

स्थायी समितीला दिली माहिती

मुंबईतील १८ वर्षांवरील लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता, राज्य शासनाकडून प्राप्त होणारा लससाठा हा खूप कमी प्रमाणात व अनियमितपणे होत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने लेखी स्वरुपात स्थायी समितीला सादर केली आहे. मागील स्थायी समितीच्या सभेत भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुंबईतील महापालिकेची लसीकरण केंद्रं बंद असून खासगी लसीकरण सुरू आहे, असे सांगत लसीकरणाच्या सद्यस्थितीची माहिती त्यांनी मागवली होती.

७६ लाख ९६ हजार २५ लसींचे वितरण

या प्रश्नाला उत्तर देताना प्रशासनाने राज्य शासनाकडून कमी प्रमाणात, तसेच अनियमित साठा मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेला आतापर्यंत ४९ लाख ८९ हजार ४७० लसींचा साठा प्राप्त झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर ११ ऑगस्टपर्यंत महापालिका, राज्य शासन यांच्या अखत्यारितील मोफत लसीकरण केंद्र आणि खासगी रुग्णालयांमधील केंद्र आदी ठिकाणी मिळून, एकूण ७६ लाख ९६ हजार २५ एवढ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून लस खरेदी करण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार खासगी लसीकरण केंद्रांमध्ये नियमित लसीकरण मोहीम राबवली जात असल्याचेही म्हटले आहे.

(हेही वाचाः भायखळ्यात शिवसेनेला धक्का, यामिनी जाधवांची आमदारकी जाणार?)

लसीकरण केंद्र १९ आणि २० ऑगस्ट २०२१ रोजी बंद

कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे, मुंबईतील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर गुरुवार १९ व शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी लसीकरण बंद राहणार आहे. १९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाला लससाठा प्राप्त होणार आहे. त्यामुळे २० ऑगस्ट २०२१ रोजी दिवसभरात लस केंद्रांना त्याचे वितरण करण्यात येईल. त्यामुळे शनिवारी २१ ऑगस्ट २०२१ रोजी लसीकरण पुन्हा सुरू होईल, असे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.