‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमचा विरोध नव्हता किंवा कोणती हरकतही नव्हती.’, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे; मात्र त्यांच्याच सोबत असलेल्या आघाडीतील उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना खोटे ठरवले आहे. पवार यांच्या वक्तव्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायला विरोध होता.’ पवार यांच्या मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी केलेले हे विधान म्हणजे एक प्रकारे राऊत यांनी शरद पवारांना खोटे ठरवले आहे, अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. (Sharad Pawar)
(हेही वाचा – CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंना हिंदुत्व नकोसं झालं आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात)
शरद पवार काय म्हणाले?
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा होता. शिवसेना हा पक्ष नेतृत्वसापेक्ष आहे. यामुळेच मी उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमचा विरोध नव्हता किंवा कोणती हरकतही नव्हती; पण महाविकास आघाडीची बैठक झाली आणि नेतानिवडीचा विषय आला. त्यावेळी सर्वजण गप्प होते. शिंदे यांचे नाव आमच्यापुढे चर्चेत आले नव्हते. शिंदे यांच्या नावाबाबत शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचे आम्हाला नंतर समजले; पण त्यावेळी आम्हाला काहीही माहीत नव्हते. त्यामुळे मी शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही किंवा शिंदेंसह अन्य कोणाचेही नाव सुचविले नाही. शिंदे यांच्यावरून पक्षांतर्गत वेगळी चर्चा होती हे आम्हाला काहीच माहीत नव्हते. शिंदेंबरोबर आमचा त्या वेळेपर्यंत फारसा संबंध आलेला नव्हता. आता शिंदे आमच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून आहेत. (Sharad Pawar)
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा शिंदेंना होता विरोध – राऊत
मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती; पण त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायला विरोध केला होता. कॉंग्रेसचीही हीच भूमिका होती. विशेष म्हणजे २०१९ मध्ये जेव्हा भाजपासोबत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू होती तेव्हा भाजपाच्या नेत्यांचा हा निरोप होता की, दिल्लीतून जो काही याबाबत निर्णय होईल तो होईल; पण जर का शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले गेले, तर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही स्वीकार करणार नाही. (Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community