काँग्रेसला शिवसेना संपवतेय का? काँग्रेसच्या नेत्यांना का वाटतंय असं

141

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस घटक पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या एकला चलो रेच्या नाऱ्याने शिवसेने त्यांना आतापासूनच बाजूला सारण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील महापालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पणामध्ये खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दर्शन घडले, परंतु काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप किंवा काँग्रेसमधील सरकारमधील नेते बाळासाहेब थोरात यांचे दर्शन घडले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरलं असून काँग्रेसला बाजूला सारत त्यांना संपवण्याचा निर्धारच शिवसेनेने केला आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवता ठेवता आता काँग्रेसच मुंबईतून संपत चालला आहे. त्यामुळे ज्या मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली त्याच मुंबईतून काँग्रेस संपण्याची भीती कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

( हेही वाचा : ‘कैदी नंबर 5681’ गुणरत्न सदावर्ते १८ दिवसांनंतर कारागृहाच्या बाहेर )

मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात असला तरी भाजपचे मनसूबे यशस्वी होऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाने कायम सत्ताधारी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे काम केले. सत्ताधारी शिवसेनेला विकासकामांचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यास मदत केल्यानंतरही मुंबईतील मागील काही आठवड्यातील लोकार्पण झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनाच डावलले गेल्याचे दिसून आले आहे. दादर आणि गिरगावमधी दर्शनी गॅलरीचे लोकार्पण तसेच बेस्टच्यावतीने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड-एनसीएमसीच्या लोकार्पण सोहळ्यातही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाहेबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती दिसून आली आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकासकामांमध्ये विशेष रस घेताना दिसत असून ते स्वत: शिवसेनेसोबत श्रेयाचे वाटेकरी होताना दिसत आहे. मात्र, या तिन्ही विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी एकमेव पालकमंत्री अस्लम शेख हे वगळता काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. अस्लम शेख हे शहराचे पालकमंत्री म्हणून निमंत्रित केले जात असून काँग्रेसने नेते बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहत नसतानाही भाई जगतात यांनाही निमंत्रित केले जात नाही की महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही निमंत्रित केले जात. बेस्ट समितीचे सर्वात ज्येष्ठ सदस्य हे रवी राजा आहेत. परंतु त्यांनाही बोलावण्यात आले नाही. माजी महापौर आणि माजी बेस्ट समिती अध्यक्षांना बोलावण्यात आले. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या माजी विरोधी पक्षनेत्यांना बेस्टसहित इतर सर्व कार्यक्रमात डावलण्यात आल्याने मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी उमटली आहे.

काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न 

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही आता याबाबत नाराजी व्यक्त केली जात असून जर सरकार आपल्याला विचारत नसेल तर सरकारमध्ये राहण्याची गरज काय असा सवाल त्यांच्याकडून केला जावू लागला आहे. एकाबाजुला भाजपला सत्तेपासून बाजुला ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला वारंवार साथ दिली. परंतु काँग्रेसचे उपकार मानण्याऐवजी राष्ट्रवादीशी भविष्यात युती गृहीत धरून आपल्या पक्षाला जर संपवण्याचा प्रयत्न होणार असेल तर यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलेच बरे अशाप्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेला साथ देता देता काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष असल्याचे विसरुन गेला असून ती जागा आता भाजपने घेतली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत विद्यमान तरी नगरसेवक निवडून येतील का याबाबत खुद्द विभागातील कार्यक्रर्ते साशंक आहेत. तळागाळातील कार्यकर्ताही आता संपलेला असून भाजपला संपवता संपवता शिवसेनेने राष्ट्रवादीला हाताशी धरून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याच्या तीव्र भावना आता ऐकायला येवू लागल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.