– नित्यानंद भिसे
पॅलेस्टिनी गाझा पट्टीत Israeli-Palestinian conflict सुरू आहे. इथे हमास या दहशतवादी संघटनेने शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर ५ हजार रॉकेटचा मारा केला, तसेच शस्त्रास्त्रे घेऊन इस्रायलमध्ये घुसखोरी करून इस्त्रायलच्या नागरिकांचे अपहरण केले. त्यावर आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्यामुळे ही तिसरी महायुद्धाची सुरुवात आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’सोबत बोलताना सांगितले की, तिसरे महायुद्ध सुरु होणार नाही तर ते आधीच सुरु झाले आहे. सध्या इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी सविस्तर प्रकाश टाकला आहे.
प्रश्न : Israeli-Palestinian conflict चा काय परिणाम होईल?
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन : हमासचे दहशतवादी आणि इस्त्रायल यांच्यात मोठे युद्ध सुरु झाले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले आहेत आणि आता या दहशतवाद्यांनी हातामध्ये शस्त्रे घेऊन इस्त्रायलमध्ये घुसखोरी केली आहे. तेथील नागरिकांची हत्या करत आहेत. त्याला इस्त्रायलने प्रत्युत्तर देण्यासाठी हमासच्या तळांवर हल्ला सुरु केला आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर सुरु केला आहे. पण हमासचे तळ हे नागरी वस्त्यांमध्ये आहेत. त्यामुळे हे तळ जरी उद्धवस्त केले तरी त्यासोबत त्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या नागरिकांची मोठ्या संख्येने जीवित हानी होणार आहे. त्यामुळे हे युद्ध थांबायला पाहिजे कारण यात इस्रायलचे नुकसान होत आहेच, त्याच बरोबर पॅलेस्टिनमध्ये राहणाऱ्या नागरिकांचेही मोठ्या संख्येने जीव जाणार आहेत. परंतु हे सध्या शक्य होणार नाही, कारण दोन्ही घटक एकमेकांशी चर्चा करायला तयार नाहीत. इराण हा हमासला मदत करतो, तर इस्रायलकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. त्यामुळे हा जगाचा शांततेला मोठा धोका आहे. अमेरिका आणि सौदी अरेबिया हे इस्रायलवर दबाव टाकून हे युद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशाही बातम्या येत आहेत. याला किती यश येईल हे पहावे लागेल.
(हेही वाचा Israeli-Palestinian conflict : भारताने इस्रायलला दिला नैतिक पाठिंबा; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?)
प्रश्न : पॅलेस्टिनने इस्त्रायलच्या विरोधात जगभरातील मुस्लिम राष्ट्रांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, त्याला किती प्रतिसाद मिळेल?
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन : हमासला शस्त्रांची कमी नाही, पण त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमी आहे. पण म्हणून इतर मुस्लिम राष्ट्रे हमासला मनुष्यबळ पुरवून युद्धात भाग घेत आहेत, असे अजून तरी पुढे आलेले नाही. इतर मुस्लिम राष्ट्रे हमास आणि पॅलेस्टिनला नैतिक पाठिंबा देत आहेत, शस्त्रे पुरवत आहेत, ते त्यांना पैसे पुरवतात, युद्धात नुकसान होईल तेव्हा त्यांच्या भरपाईसाठी मदत करतील, परंतु प्रत्यक्ष सैन्य बळ पुरवण्या इतपत सक्रिय पाठिंबा देणार नाही. मिडल ईस्टकडून हमासला पाठिंबा मिळावा म्हणून हमास प्रयत्न करेल, पण इस्त्रायल त्यांना चिरडून टाकील.
(हेही वाचा Israeli-Palestinian conflict : भारताने इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अॅडव्हायजरी केली जारी)
प्रश्न : इस्रायलने अरब देशांशी चांगले संबंध बनवले होते, त्यात खोडा घालण्यासाठी हा हल्ला झाला आहे का?
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन : इस्रायलचे सर्वच अरब राष्ट्रांसोबत चांगले संबंध नाहीत. फक्त युएई आणि सौदी अरेबिया या दोनच राष्ट्रांशी इस्रायलचे चांगले संबंध होत आहेत. त्यांचा संबंध व्यापार आणि आर्थिक बाबींशी आहे. इस्त्रायलला या राष्ट्रांशी आर्थिक संबंध नक्कीच वाढवायचे आहेत. पॅलेस्टिनी आणि इस्त्रायल यांच्यातील वैर हे १०० वर्षे जुने आहे. पॅलेस्टिनला स्वतंत्र देश बनायचा आहे आणि ते इस्रायल बनू देणार नाही आणि इस्त्रायलला त्यांना नष्ट करायचे आहे, ते नष्ट होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात हे दोघेही एकमेकांशी लढतच राहतील, याची कारणे वेगवेगळे असतील.
प्रश्न : Israeli-Palestinian conflictच्या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार?
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन : या युद्धाचा भारतावर काही परिणाम होणार नाही, हे युद्ध भारताच्या बाहेर सुरु आहे. त्यात इराणचा आणि इस्रायलचा पैसा वाया जात आहे. या दोन राष्ट्रांच्या नुकसानीचा भारतावर काही परिणाम होणार नाही.
(हेही वाचा Israel News : हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले, इस्रायल सरकार देणार ‘असे’ प्रत्युत्तर)
प्रश्न : इस्त्रायल-हमास यांतील युद्ध तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे का?
ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन : तिसरे महायुद्ध सुरूच आहे. सध्या जे आर्थिक युद्ध सुरु आहे, ज्यामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यात हे युद्ध सुरु आहे. आता कॅनडाने जे भारताच्या विरोधात सुरु केले आहे, हे सगळे युद्धच आहे. हे युद्ध फक्त बंदुकीचे युद्ध असावे असे नाही. ज्याला आपण बहुआयामी प्रकारचे युद्ध म्हणू शकतो.
Join Our WhatsApp Community