आशिष शेलारांना ना प्रदेशाध्यक्ष ना मंत्रीपद

181

राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली असून मुंबईतील आमदार आशिष शेलार यांना आता प्रदेशाध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली आहे. मागील काही दिवसांपासून शेलारांनी प्रदेशाध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी आता महाराष्ट्रभर दौरे करण्यास सुरुवात केली आहे. परंतु शेलारांनी आता मुंबईच्या बाहेर आपल्या नेतृत्वाच्या कक्षा रुंदावण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी शेलारांचा प्रदेशाध्यक्षपदासह मंत्रीपदाचाही पत्ता कापला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( हेही वाचा : पोलीस बळी देत नाही, तर गटारी अमावस्या सण म्हणून साजरा होतो! ‘त्या’ परिपत्रकावर पोलीस नाराज )

प्रदेशाध्यक्षपदावर काट मारली जाण्याची शक्यता

राज्यातील ठाकरे सरकार बरखास्त झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला पाठिंबा देत भाजपने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये सहभागी न पक्षाचे काम करणार आहे. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा प्रकट केली. परंतु पंतप्रधान आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सूचना केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. परंतु दुसरीकडे आमदार आशिष शेलार यांनी आपले नेतृत्व राज्यभर पसरवण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये भेटीगाठी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यातील मंत्री मंडळात स्थान न मिळाल्यास आपल्याला प्रदेशाध्यक्षपद मिळावे अशी शेलारांची इच्छा दिसत असून त्यादृष्टीकोनातच मुंबईसह राज्यातील विविध शहरांसह जिल्हा आणि गावांना भेटी देण्यास सुरुवात केली.

शेलारांना प्रदेशाध्यक्ष बनण्याची तीव्र इच्छा असली तरी ते मुंबईचे असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष बनण्यात अडचणी असल्याचे बोलले जात आहे. मुंबईचे अध्यक्ष हे स्वतंत्र बनवले जातात, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बनवताना मुंबईतील नेत्याचा विचार केला जात नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेलारांऐवजी चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन किंवा राम शिंदे आदींची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे शेलारांच्या प्रदेशाध्यक्षपदावर काट मारली जाण्याची शक्यता आहे. शेलार हे सध्या भाजप नेते अमित शहा यांच्या गुडबूकमध्ये असले तरी प्रदेशाध्यक्षपदावर वर्णी लावण्यात येणारी तांत्रिक अडचण पाहता शेलारांना या पदापासून दूर ठेवावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिका निवडणुकीनंतरच मंत्रीमंडळ विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यता

तर, दुसरीकडे राज्य मंत्रीमंडळात आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा असून शेलारांचा तुर्तास तरी मंत्रीमंडळात समावेश होणार नसल्याची माहिती मिळत आहे. शेलार यांना मुंबई महापालिका निवडणूक संयोजन समिती प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी महापालिका निवडणूक दोन महिन्यांवर आलेली असल्याने शेलारांना पहिल्या टप्प्यातील मंत्रीपदासाठी वर्णी लावणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेलारांना महापालिका निवडणुकीनंतरच मंत्रीमंडळ विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.