भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी लोढा असणे शिवसेनेच्या पथ्यावर

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाताना आता सर्व पक्षांनी आपली रणनीती आखून त्याप्रमाणे कामांना सुरुवात केलेली आहे. त्यानुसार मागील २५ वर्षे महापालिकेवर भगवा फडकवणाऱ्या शिवसेनेनेही भाजपला कुठलीही संधी न देण्याचा निर्धार केला आहे. भाजपच्यावतीने सध्या मुंबईत मराठी कट्टा आणि चौपालसारखे कार्यक्रम करून मराठी आणि उत्तर भारतीय लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असला तरी त्यांच्या मुंबई अध्यक्षपदी असलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे, तसेच त्यांचे पक्षातील पदाधिकाऱ्यांशी जुळत नसल्याने, हे शिवसेनेच्या पथ्यावर पडत आहे. म्हणूनच निवडणुकीपर्यंत भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी लोढाच राहावेत, अशी इच्छा खुद्द शिवसेनेची आहे.

महापालिकेवर झेंडा फडकवण्याचा भाजपचा निर्धार

मुंबई महापालिकेच्या सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती आणि दोन्ही पक्षांनी प्रथमच महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली होती. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष व इतरांना जागा सोडत भाजपने एक ते दोन जागा वगळता सर्वच जागा लढवल्या. यामध्ये भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे सर्व जागा लढवूनही ८४ नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती केली. परंतु मागील महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणी युती फसल्याने उमेदवार निवडीपासून घाई झालेल्या भाजपने यंदा स्वबळावर ही निवडणूक लढवताना भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकवण्याचा पक्का निर्धार केला आहे.

(हेही वाचा : रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी)

लोढांविषयी भाजपामध्ये नाराजी

भाजपच्यावतीने सध्या सर्व प्रकारचे अभियान राबवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत असला, तरी भाजपच्या मुंबई अध्यक्षांची मवाळ भूमिका ही पक्षाला घातक ठरत आहे. भाजपचे मुंबई अध्यक्षांचे जिल्हाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका तसेच पक्षातील अन्य सदस्यांना योग्यप्रकारे लोढा यांचे मार्गदर्शन मिळत नाही. तसेच पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमांनाही लोढा फारशी उपस्थिती लावत नाहीत, त्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत, अशा प्रकारचे मतप्रवाह लोढांविषयी आहे. एकप्रकारे भाजपमध्ये मुंबई अध्यक्षांबाबत फारसे चांगले मत नाही. निवडणूक जवळ आली तरी लोढा यांचा सक्रीय सहभाग नसल्याने तसेच स्वत: पुढाकार घेवून कार्यकर्त्यांना प्रेरित करत नसल्याने एकप्रकारे त्यांचे हे वर्तन शिवसेनेच्या पथ्यावर पडत आहे. लोढा यांच्याविषयी पक्षातच नाराजी आहे.

शिवसेना फायदा घेण्याच्या तयारीत

त्यामुळे या नाराजीचा फायदा घेण्याच्या विचारात शिवसेना आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, लोढा यांचे वर्तन हे सध्या त्यांच्याच पक्षातील लोकांच्या पचनी पडत नाही. ज्याप्रकारे भाजप निवडणुकीकरता आक्रमक होत चालला आहे, त्याप्रकारे मुंबई अध्यक्षांमध्ये काही आक्रमकता दिसून येत नाही. त्यामुळे मुंबई अध्यक्षांच्या या मवाळ स्वभावाचा फायदा नक्कीच शिवसेनेला होईल. मागील निवडणुकीत मुंबई अध्यक्षपदी असलेल्या आमदार आशिष शेलार यांनी मुंबई ढवळून काढली होती. परंतु सध्या पक्षाच्या बाहेरुन आलेली जी काही दोन-चार मंडळी काम करत आहेत. त्याचा फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे लोढा हे मुंबई अध्यक्षपदी राहणे शिवसेनेच्या हिताचे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु लोढा यांच्याऐवजी आक्रमक अध्यक्ष बनल्यास शिवसेनेला खूप गंभीरपणे भाजपच्या सध्या सुरु असलेल्या अभियानांचा विचार करावा लागेल, असेही शिवसेनेच्या एका नेत्याचे म्हणणे आहे. लोढा यांचा शांत स्वभाव असला तरी त्यांचा मनमिळावू स्वभाव नसल्यामुळे पक्षाला पुढे घेऊन जाण्यात त्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे पक्षासाठी लोढा यांना आपल्या व्यवहारीक स्वभावात बदल करणे गरजेचे आहे. अन्यथा पक्षालाही नवीन आक्रमक मुंबई अध्यक्ष देण्याची गरज भासणार आहे. म्हणून पक्षासाठी मुंबई अध्यक्ष स्वभावात बदल करता की पक्ष त्यांना बदलतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here