…तर मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत घेणे अशक्यच

त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर टाकण्याशिवाय पर्यायच नसल्याचे बोलले जात आहे.

69

मुंबई महापालिकेची सार्व़त्रिक निवडणूक नियोजित वेळेतच घेण्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले असले, तरी कोविड काळातील परिस्थिती पाहता ही निवडणूक फेब्रुवारी २०२२ला घेणे अशक्यच असल्याची बाब समोर येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत जर निवडणूक घ्यायची झाल्यास एकूण मतदार केंद्रांची संख्या दुप्पटीने वाढवावी लागणार आहे. त्यामुळे यासाठी दुप्पट मनुष्यबळ लागणार असून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करुनही ही निवडणूक पार पाडता येणार नाही. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर टाकण्याशिवाय पर्यायच नसल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः महापालिकेची निवडणूक घ्यायची कि नाही‌?)

यंत्रणेत करावी लागणार वाढ

मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ रोजी नियोजित असून, कोविड-१९ मध्ये ही निवडणूक पुढे ढकलावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच सोमवारी झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला निवडणुकीचे काम पुढे चालू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिका निवडणूक विभागाने काम सुरू केले असले, तरी कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन करायचे झाल्यास सध्याच्या मतदार यादीनुसार प्रत्येक बूथ हा १२०० हून अधिक मतदारांचा आहे. त्यामुळे या बूथमध्ये ६०० ते ७०० मतदारांची एक मतदार यादी तयार करावी लागणार आहे. अर्थात एका बूथचे दोन बूथ करावे लागणार आहेत. त्यामुळे यासाठीचे मनुष्यबळ, पोलिस यंत्रणा तसेच इव्हीएम मशीन यांच्यात दुप्पटीने वाढ करावी लागणार आहे.

(हेही वाचाः मुंबई महापालिका निवडणुकीचे काय होणार? वाचा…)

कर्मचारीवृंद कमी

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेचा कर्मचारीवृंद कार्यरत असतो. या निवडणुकीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात नाही. प्रत्येक निवडणुकीत एकूण कर्मचाऱ्यांपैकी ७० ते ८० टक्के कर्मचाऱ्यांचा वापर केला जातो. परंतु सध्या यापैकी ३० ते ४० टक्के कर्मचारी हे कोविड आणि तत्सम कामांसाठी जुंपले गेले आहेत. त्यामुळे जर मतदान बूथची संख्या वाढवल्यास महापालिकेचा कर्मचारीवृंद कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचाः मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्यास ‘या’ दोन पक्षांचा फायदा)

मुंबईसाठी धोक्याचे

विशेष म्हणजे महापालिकेच्या शाळांसह समाज कल्याण केंद्र व इतर जागा लसीकरणासाठी वापरात आहेत. त्यामुळे मतदान बूथची संख्या दुप्पट करावी लागल्यास, मतदान केंद्रांच्या जागा अधिक निवडाव्या लागणार आहेत. त्यामुळे तसे झाल्यास मोकळ्या जागांचा व मैदानांचा शोध घ्यावा लागणार आहे. महापालिका आणि पोलिस यांचे दुप्पट मनुष्यबळ, तसेच दुप्पट इव्हीएम मशीनचा वापर होणार असल्याने सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर नियोजित कालावधीत या निवडणुका घेणे मुंबईसाठी धोक्याचे ठरेल, असे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.

(हेही वाचाः महापालिका निवडणूक २ वर्षे लांबणीवर टाकण्याचा सेनेचा कट! भाजपचा आरोप )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.