महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी मनसेसह काही शिवसैनिकांकडून केली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र हे दोघे एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना करता हा काळ कठीण असला तरी राज ठाकरे यांना सोबत घेऊन आदित्य ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही. मनसे उबाठा शिवसेनेसोबत आल्यास आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला खिळ बसेल याची भीती उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. त्यातच यापूर्वी देण्यात आलेल्या टाळीला प्रतिसाद न देता दगाफटका झाल्याची सल मनात असल्याने हे दोघेही नेते एकत्र येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार, १३ खासदार यांसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बाहेर पडून शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधूनही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि पदाधिकारी बाहेर पडले असून त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाच्या घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशा प्रकारची आर्जवी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. अनेक ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा प्रकारची बॅनरबाजीही करण्यात आली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही पार पडली मध्ये बैठकीत अशा प्रकारची चर्चा झाल्याची आवई माध्यमांनी उठवली असली तरी प्रत्यक्षात मात्र हा मुद्दा राज ठाकरे यांनी खोडून काढत अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा प्रकारची मागणी ही प्रथमच केली जात नसून आजवर अनेकदा अशा प्रकारचे प्रयोग करण्याचा प्रयत्नही झाला होता. मात्र प्रत्येक वेळी याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. यपरंतु या पक्षाची वाढ योग्य प्रकारे होत असतानाच त्याची वाढ मागील लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत खुंटली. मुंबईतील सात नगरसेवकांपैंकी सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन मनसेला संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे मनसेमध्ये उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात प्रचंड संताप आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी मनसेला संपलेला पक्ष अशी उपमा दिल्याने ही टिका तर मनसैनिकांसह राज ठाकरे यांच्या जिव्हारी लागलेली आहे. त्याला मनसेनेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार खासदार नगरसेवक फुटल्यानंतर मनसेनेही त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजवर शिवसेना आणि मनसे यांच्यात वाकयुध्द पहायला मिळत आहे. मात्र हे दोघेही न येण्याची काही कारण आता समोर येत आहे. त्यातील पहिलं कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
(हेही वाचा – अजित पवार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष; शरद पवारांची हकालपट्टी)
संजय राऊत यांनी शनिवारी झालेल्या मोर्चात आदित्यचा उल्लेख देशाचे नेतृत्व म्हणून केले. आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे अध्यक्ष आणि त्यानंतर माजी मंत्री म्हणून पद भुषवल्यानंतर त्यांच्याकडे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते राज्याचे नेतृत्व म्हणून पाहत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना आपल्याकडील नेतृत्व गुण सिध्द करण्याची संधी असताना तसेच त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये असा विचार करत जो मूळ शिवसैनिक पक्षात आहे, त्यांच्या जोरावर आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेऊन आदित्य ठाकरे यांची राजकीय कारकिर्द झाकोळण्याचा प्रयत्न शिवसेना करणार नाही असे उबाठा गटाच्या शिवसेनेतील नेत्यांना वाटत आहे. तर मनसेच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता मनसेला आता चांगले दिवस येणार आहे.
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जाऊन पक्षाला कोणताही फायदा होणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. त्यातच त्यांच्या पक्षाने आणि उध्दव ठाकरे यांनी जो त्रास आमच्या पक्षाच्या अध्यक्षांना दिला आहे, तो तर चुकीला माफी नाही, यातलाच आहे. आज मनसेचे नाही तर उबाठा शिवसेनेचे वाईट दिवस आहे. त्यांनी आपला मार्ग निवडावा. मनसेसाठी उबाठा शिवसेनेचा मार्ग नाही. किंबहुना मनसैनिकही हे मान्य करणार नाही. संपलेला पक्ष असे म्हणून हिणवणाऱ्या शिवसेनेसोबत गेल्यास मनसेला होणारे मतदानही होणार नाही. त्यापेक्षा स्वतंत्र लढल्यास मनसे हा एकमेव पक्ष असा आहे ज्याची भूमिका एकच आहे, त्यांच्या भुमिकेत कोणताही बदल झालेला नाही, हे जनतेच्या मनावर बिंबवले गेले आहे. त्यामुळे मनसेला होणारा फायदा लक्षात घेता उध्दव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा कोणताही निर्णय राजसाहेब ठाकरे घेणार नाही, असेही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community