भाजपचा मराठी कट्टा मागे, चौपालच सरस!

137

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाताना मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी ‘मराठी कट्टा’ आणि उत्तर भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी चौपालचे कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. महापालिकेची निवडणूक मराठीच्या मुद्दयावर लढायला निघालेल्या भाजपकडून विधान परिषदेवर महापालिकेतून पाठवण्यात येणाऱ्या भाजपकडून माधव भंडारी, केशव उपाध्ये, चित्रा वाघ आदी मराठी चेहरे असताना भाजपने उत्तर भारतीय समाजाचे नेतृत्व करणाऱ्या राजहंस सिंह यांना उमेदवारी देत चौपालला महत्व देत मराठी कट्टाला मागे सारल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना भाजपचे पारडे जड

मुंबई महापालिकेतून ज्या दोन आमदारांना निवडून दिले जाणार आहे, त्यामध्ये एक जागा शिवसेनेला आणि दुसरी जागा भाजपसाठी सुरक्षित मानली जात आहे. त्यामुळे शिवसेनेने वरळीतील माजी आमदार सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विधान परिषदेत आमदाराच्या निवडीसाठी ७७ ते ७८ मतांची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेकडे सध्या ९९ तर भाजपचे ८३ नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे पारडे जड आहे. पण विद्यमान आमदार भाई जगताप यांच्या पत्ता कापला जाणार आहे.

महाविकास आघाडी धर्म म्हणून शिवसेनेने आपल्याकडील सुमारे १८ ते १९ मते फिरवली तरीही काँग्रेसच्या ३०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ०८, समाजवादी पक्षाचे ०६, मनसेचे ०१ आदींची मोट बांधली तरीही ६३ ते ६४ सदस्य संख्या होऊ शकते. त्यामुळे काँग्रेसच्या आसपासही विजय नसल्यामुळे या निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्धार जगताप यांनी केला असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या काही नेत्यांचे, आपला उमेदवार देणे आवश्यक आहे असे, म्हणणे आहे. शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी जाहीर करून एकप्रकारे शिवसैनिकांमध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षात निष्ठावंतांनाच प्रथम स्थान असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.

(हेही वाचा : ईडीकडून खासदार भावना गवळींना तिसरं समन्स! )

भाजपसाठी चौपालच महत्वाचे

तर भाजपने, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी महापालिका विरोधीपक्षनेते आणि माजी आमदार राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सिंह यांना उमेदवारी देत भाजपने उत्तर भारतीयांचे मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेत उत्तर भारतीय नेता नसल्याने भाजपने राजहंस सिंह यांचे नाव पुढे केले आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी प्रथेप्रमाणे माधव भंडारी, केशव उपाध्ये, चित्रा वाघ यांच्या नावावर फुल्ली मारली गेली आहे. राजहंस सिंह यांच्याऐवजी विनोद तावडे यांना उमेदवारी देता आली असती. परंतु पक्षाने मराठी चेहऱ्याऐवजी उत्तर भारतीय चेहऱ्याला प्राधान्य देत भाजपसाठी चौपालच महत्वाचे असून मराठी कट्टा नाही असेच यातून अभिप्रेत केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.