शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्याचा जो अर्थ घ्यायचा तो घेतला. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे महाराष्ट्राचे मणिपूर होईल असे आहे. दोन समाजातील निर्माण झालेल्या तेढवर त्यांनी असे वक्तव्य केले आहे. जातीय दंगली पेटणार आहेत, असे भाकीत करणे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार निघाले तर राज्यात येणारी गुंतवणूक थांबते. पूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीने जातीजातीत भांडणे लावून आपले राजकारण केले आहे, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केली.
शरद पवारांनी गोलमोल भूमिका घेतली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना बोलवून मराठा आरक्षणाबाबत बैठक घेतली. ठाकरे गटाच्या नेत्यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसच्या नेत्याने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आरक्षणाबाबत गोलमोल भूमिका घेतली आहे. आरक्षणाला सरकार जबाबदार आहे. सरकारला फासावर लटकवले पाहिजे, अशा पद्धतीने राजकारण केले जाते. शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला आहे. एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनातून बोलायचे, हाकेच्या आंदोलनाला फुस लावायची, असा आरोप देखील संजय शिरसाट यांनी केला. गेल्या 40 वर्षांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने त्याची कधी दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा समाज व्यथित झाला होता. 40 वर्षानंतर शिंदे सरकार आल्यानंतर त्यांची दखल घ्यायला सुरुवात झाली, असेही शिरसाट म्हणाले.
Join Our WhatsApp Community