अभियंत्यांना खड्डे पावले : इतर कामांमधून करणार कार्यमुक्त

मध्यवर्ती यंत्रणेकडे कोल्डमिक्सचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. काही विभागांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रस्ते अभियंत्यांवर कामकाजाचा अतिरिक्त ताण आहे.

मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांवर मागील काही दिवसांपासून हल्ले होत असल्याने अभियंत्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. अभियंत्यांना त्यांच्यावरील विभाग तथा खात्यांच्या जबाबदारी व्यतिरिक्त अन्य कामे सोपवली गेली असून त्यामुळे या अभियंत्यांचा स्वत:च्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातूनच आता रस्त्यांवरील खड्डयांची समस्या निर्माण होवू लागली. त्यामुळे अखेर महापालिका आयुक्तांना अभियंत्यांच्या प्रमुख समस्येकडे लक्ष वेधावे लागले आहे. ज्या विभाग कार्यालयांमध्ये रस्ते विभागातील अभियंत्यांना इतर कामे तथा जबाबदारी सोपविली असतील, तर त्यांना इतर कामांमधून तत्काळ कार्यमुक्त करुन पुढील १ महिनाभर फक्त रस्ते परिरक्षण विषयक जबाबदारीच प्राधान्याने देण्यात यावेत असे निर्देश आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

 खड्डे भरण्याच्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश 

मुंबई महानगरातील रस्त्यांवर पावसाळ्यामुळे निर्माण झालेले खड्डे आणि पावसाळी साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजना या संदर्भात महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह सर्व संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी आयुक्तांनी, वाहतूक पोलिसांनी निदर्शनास आणून दिलेल्या रस्त्यांवरील तसेच जास्त वर्दळींच्या रस्त्यांवरील खड्डे देखील प्राधान्याने भरावे, जेणेकरुन वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही. शक्यतो रात्रीच्या वेळी खड्डे भरण्याची कार्यवाही करावी. म्हणजे वाहतुकीला अडथळा होणार नाही. सर्व कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल प्रमुख अभियंता (रस्ते) यांनी सादर करावा. तसेच समाज माध्यमांवर येणाऱ्या तक्रारींवरही कार्यवाही पूर्ण करुन योग्य प्रतिसाद द्यावा.   पुढील २ ते ३ आठवड्यात या सविस्तर सुचनांचे दररोज तंतोतंत पालन करुन लक्षणीय आणि प्रभावी असा बदल प्रत्यक्षात आढळला पाहिजे. या सर्व कामकाजावर मी स्वतः दररोज लक्ष ठेवणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त चहल यांनी नमूद केले.

(हेही वाचा : मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात १ हजार कोटींचा दावा!)

 मध्यवर्ती यंत्रणेकडे कोल्डमिक्सचा पुरेसा साठा उपलब्ध

रस्त्यांवरील खड्डे भरताना त्यांचे योग्य मोजमाप करुन तातडीने भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती यंत्रणेकडे कोल्डमिक्सचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. काही विभागांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रस्ते अभियंत्यांवर कामकाजाचा अतिरिक्त ताण आहे. शिवाय इतर कामकाजही त्यांना देण्यात आले आहे. मात्र, आता पुढील १ महिने रस्ते अभियंत्यांना इतर/अवांतर कोणतीही कामे न सोपवता प्राधान्याने रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याने त्यांना लक्ष केंद्रीत करता येईल, रस्ते कामांच्या अनुषंगाने माहिती देताना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू  यांनी यावेळी दिली. मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांवर त्यांच्यावरील जबाबदारी व्यतिरिक्त अन्य कामे सोपवली जातात. आज कोविडमधील कामे असो वा रेल्वे स्थानकावर दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया असेल. जर प्रशासन अशाप्रकारे जबाबदारी व्यतिरिक्त कामे सोपवून मुख्य कामे त्यांच्याकडून करून घेत नसेल तर मग प्रशासनाला त्यांना संबंधित कामांसाठी जबाबदार धरण्याचा अधिकार काय? आज रस्त्यांवरील खड्डयांसाठीही अभियंत्यांना जबाबदार धरले जाते. रस्त्याचा पालक म्हणून अभियंत्यावर जबाबदारी टाकली, परंतु त्यांना जर इतर कामांसाठी जुंपले गेले तर ते रस्त्यांवरील खड्डयांकडे कधी लक्ष देणार, असा सवाल करत यापुढे अभियंत्यांना त्यांच्याकडील जबाबदारी व्यतिरिक्त कोणतेही काम दिले जावू नये, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here