छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात ३५० कार्यक्रम घेण्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र, या घोषणेला २० दिवस पूर्ण होत नाहीत, तोवर राज्य सरकारने माघार घेतली आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाचा वर्षभर होणारा जागर २० दिवसांतच थांबला आहे.
३४९ व्या शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावर बोलताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामनात पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे. यापुढील काळात किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहिल. तसेच ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात वर्षभर ३५० कार्यक्रम घेण्याची घोषणाही त्यांनी केली.
(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : लोकनेते दी. बा. पाटील यांच्या नावे नवी मुंबईत संग्रहालय; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा)
परंतु, रायगडावरचा एक कार्यक्रम झाल्यानंतर पुढचे ३४९ कार्यक्रम न घेण्याचा निर्णय आता घेण्यात आल्याचे कळते. राज्य सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने या सर्व ३५० कार्यक्रमांचे कंत्राट आपल्या मर्जीतील कंपनीला देण्याचा हट्ट धरला. मात्र, मुनगंटीवार यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. कारण ही कंपनी अलीकडेच एका मोठ्या वादात अडकलेली आहे. तरीही या मंत्र्याने आपला हठवादीपणा न सोडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community