जळगावचे शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत नुकत्याच प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाला सावधानतेचा इशारा देखील दिला आहे. सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून आलेले पार्सल आहे आणि उरली-सुरली शिवसेना देखील त्या संपवून टाकतील, असे विधान त्यांनी केले आहे.
(हेही वाचा – EPF Pension Scheme 2014: EPF पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! कोट्यवधी कर्मचा-यांना होणार फायदा)
पुढे ते असेही म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे हस्तक असून शिवसेनेच्या स्थितीसाठी तेच जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना आता उरली-सुरली शिवसेना संपवण्यासाठी सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने पाठवल्याची जहरी टीका गुलाबराब पाटलांनी केली आहे.
दरम्यान, मुक्ताईनगरला चंद्राकांत पाटील आणि गुलाबराव पाटील संध्याकाळी सात वाजता सभा होती आणि सुषमा अंधारेंची देखील सभा होती. जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. तसेच ५० मिटरच्या आता दोघांना परवानगी असल्याने जिल्हाधिकारी आणि एसपींनी विनंती केली की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणं आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही परवानगी नाकारत आहोत, असे गुलाबराव पाटील म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, कोणी आमच्या समाजावर बोलून तेढ निर्माण करत असेल, तर पालकमंत्री म्हणून ते थांबवण्याची जबाबदारी माझी आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार आम्ही सभा घेणार नाही, असा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांनी दोघांचीही परवानगी नाकारली आहे असे त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे
गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा धसका घेतला आहे. पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र आम्ही अशा गुन्ह्यांना भीक घालणार नाहीत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. आम्हाला कसलीही बंदी घातली तरी शिव प्रबोधन यात्रा सुरूच राहील. या सरकारने माफिया आणि गुंडाना हाताशी धरले आहे, मी बहुजन असल्याने माझ्यावर कारवाई झाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.