जळगाव महापालिकेत सत्तांतर निश्चित, आॕनलाईन सभेला उच्च न्यायालयाची सहमती 

गुरुवारी, १८ मार्च रोजी जळगाव महापालिकेत महापौर निवडणूक होणार आहे, त्यात शिवसेनेकडे ४७ नगरसेवकांचे पाठबळ निश्चित झाले आहे. 

95

गुरुवार, १८ मार्च रोजी, जळगाव महापालिकेत सत्तांतर होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने बुधवारी, १७ मार्च रोजी आॕनलाईन विशेष सभेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली. त्यामुळे भाजपचा बचावाचा शेवटचा प्रयत्न निष्पळ ठरला आहे.

फुटीर नगरसेवकांचा स्वतंत्र गट!

महापौर निवडणूक मैदानात सरदारांचे संख्याबळ भाजपने गमावलेले आहे. फुटीर सदस्य अगोदरच मुंबई बाहेर गेल्यामुळे भाजपच्या गटनेत्यांचे व्हिप हे त्यांच्याच खिशात राहिले आहे. त्यामुळे फुटीर नगरसेवकांवर सध्या तरी भाजपचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही. शिवाय, गुरुवारी मतदानानंतर फुटीर नगरसेवकांनी भाजपचा स्वतंत्र गट स्थापन केला तर अपात्रतेच्या संभाव्य कारवाईलाही फाटे फुटतील. अपात्र होणे हे पक्षांतराला लागू आहे. भाजप अंतर्गत स्थापन स्वतंत्र गटाला नाही. या सर्व घडामोडी भाजपला चारमुंड्या चीत करताना दिसतात.

(हेही वाचा : राज्यभरात लॉकडाऊनसारखी परिस्थिती नाही! – राजेश टोपे )

४५ नगरसेवकांचे पाठबळ सेनेला निश्चित!

भाजपतून प्रिया जोहरे, सरिता नेरकर, दिलीप पोकळे, रुकसानाबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, मिना सपकाळे, दत्तात्रय कोळी, रंजना सपकाळे, प्रविण कोल्हे, चेतन सनकत, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, प्रतिभा देशमुख, कुलभूषण पाटील, पार्वताबाई भील, सिंधुताई कोल्हे, ललित कोल्हे, रेखा पाटील, सुरेखा सोनवणे, रेशमा काळे, मनोज आहुजा, मिनाक्षी पाटील, सुनील खडके हे २७ नगरसेवक स्वतंत्र गटात बसणार आहेत. याशिवाय एमआयएमचे ३ आणि शिवसेनेचे १५ असे ४५ पाठबळ नगरसेवकांचे नियोजित महापौर जयश्री महाजन व नियोजित उपमहापौर कुलभूषण पाटील यांना असेल. आॕनलाईन प्रक्रियेत पिठासीन तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे प्रत्येक सभासदाला विचारून त्यांचे मत नोंदवून घेतील.

कोविडच्या धोरणामुळे भाजपची पीछेहाट!

दरम्यान या आॕनलाईन सभेला हरकत घेणारा अर्ज भाजप नगरसेविका रंजना विजय सोनार व विश्वनाथ खडके यांनी खंडपिठात दाखल केला होता. कोवीड संसर्गाचा प्रभाव कमी झाला असून महापौर निवड आॕनलाईनऐवजी सभागृहात व्हावी, अशी मागणी या अर्जात होती. ॲड. अमरजितसिंग गिरासे व ॲड. वाय. बी. बोलकर त्यांच्याकडून होते. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुळकर्णी यांच्यासमोर याचिका आली. शिवसेनेतर्फे ॲड. ए.आर. सय्यद यांनी बाजू मांडली. सरकारने कोवीड प्रादुर्वाभ रोखण्यासंदर्भात केलेल्या नियोजनात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे सांगून याचिका फेटाळली गेली. अर्थात, भाजपतील फूट आणि नगरसेवकांच्या तक्रारी याचाही लेखाजोखा दिला गेला. सभा आॕनलाईन होणार असल्यामुळे उद्या फुटीर सदस्यांचा कोणताही संबध, संपर्क इतरांशी होणार नाही. म्हणजेच पिठासन अधिकारी यांनी केलेल्या पुकाऱ्यानंतर महापौर व उपमहापौरांना किमान ४५ मते नक्की मिळणार हे निश्चित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.